कसा करावा गावाचा विकास? : करवसुलीवर मोठा परिणाम
शशिकांत गणवीर
भेजगाव : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींची गृह व पाणी करवसुली कोरोनामुळे मंदावली आहे. परिणामी ग्रामपंचायतीचे अर्थचक्र कोलमडले असून विकास कामांवर परिणाम पडत आहे.
ग्रामपंचायतीची करवसुली विशेषता धान पीक हातात आल्यानंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटी ग्रामस्थ भरत असतात. मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाला लॉकडाऊन सुरू करावा लागला. परिणामी शेतकरी व शेतमजूर, छोटे उद्योजक यांच्या रोजगारावर पाणी फिरले. त्यामुळे अनेक नागरिकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ग्रामपंचायतीची करवसुली मंदावली. याउलट ग्रामपंचायतीचा खर्च मात्र जैसे थे आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन कर वसुलीतून होत असते. प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन, तीन कर्मचारी कार्यरत आहेत. करवसुली थांबल्याने कर्मचाऱ्यांचे ५० टक्के (ग्रामपंचायत हिस्सा) मानधन देण्यात ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर्षीच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हे अनेकांच्या हाताचे काम गेले. शेती परवडण्याजोगी राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून गृहकर्ज थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी गावांच्या विकास कामावर परिणाम पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने कर भरावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बॉक्स
पाणीपुरवठा योजनेचे वीज बिलही थकीत
मूल तालुक्यातील बहुतांश गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचे वीज बिल हजारो रुपये येते. मात्र कोरोनामुळे करवसुली झाली नसल्याने जवळपास पाच महिन्यांपासून वीज बिल थकीत आहेत. परिणामी योजनांचा पाणीपुरवठा कधी खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
नागरिकांचा कर भरण्याचा कालावधी जवळपास उन्हाळ्यात असतो आणि दोन्ही वर्षी कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट उन्हाळ्यातच आल्याने कर वसुलीवर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार व वीज बिल थकीत आहेत. ग्रामपंचायतीचा आर्थिक गाडा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
-विजय यारेवार, ग्रामविकास अधिकारी, मूल