लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील जुनासुर्ला गावात दिवसेंदिवस अवैधरीत्या दारू विक्रीचे प्रस्थ वाढल्याने व्यसनाधीनता वाढत चालली आहे. त्यावर वेळीच पायबंध घातला गेला नाही, तर भविष्यातील भावी पिढी विनाशाकडे वाटचाल करेल. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत होताच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुर्लीधर लोडेल्लीवार यांचा पुढाकाराने सभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनानी दारूबंदीचा निर्धार केला. तसेच पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केल्याने अवैधरित्या दारूची विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.दारूबंदीसाठी आयोजित केलेल्या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत कमेटी, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुर्लीधर लोडेल्लीवार, माजी अध्यक्ष किशोर सुर्रेवार, सरपंच बोंताबाई कन्नावार, पोलीस पाटील आशा देशमुख, पोलीस उपविभागीय कार्यालय मूल येथील पोलीस उपनिरीक्षक कुमरे, माजी सरपंच विलास कलसार, जेष्ठ नागरिक विराजी कंकलवार, उपसरपंच मारोती थेग्गेवार, ग्रा.प.सदस्य रेखा समर्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गावच्या सरपंच बोंताबाई कन्नावार यांनी ग्रामसभेत म्हटले की, गावात परवानाधारक दारूदुकान सुरु असताना गावातून दारूदुकान हटविण्यासाठी गावात आंदोलने घेण्यात आले. त्यावेळी गावातील काही महिलांनी रोष पत्कारुनसुद्धा दारुविक्री बंद करण्यास पुढाकार घेतला. त्यामुळे आतासुद्धा अवैध दारुविक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. तर पोलीस पाटील आशा देखमुख म्हणाल्या दारूबंदी होण्यासाठी गावात प्रयत्न कले जाते. मात्र जनतेचे सहकार्य मिळत नसल्यामुळे दारूबंदी होणास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांने सहकार्य करावे. तसेच नव्याने निर्माण झालेली महात्मा गांधी तंटामुक्त समिती दारूबंदीसाठी प्रयत्न करेल, असा विश्वास आहे. त्यामुळे सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले. पोलीस उपविभाग मूलचे उपनिरीक्षक कुमरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, दारूबंदीसाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. दारूबंदी पोलीस करतील हे त्यांचे काम आहे. असे माणून हात झटकले जाते. या बरोबरच दारूबंदीसाठी वेगळे पथकसुध्दा निर्माण करण्यात आले. पोलीस प्रशासन अवैध दारुविक्रीबाबत सकारात्मक असून यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे. व्यसनाधिनतेवर पायबंध घालण्यासाठी पोलिस आपल्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रात्रो ८ वाजता सुरू झालेली सभा रात्री ११.३० वाजतापर्यंत चालली. यात दारूबंदीबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी जुनासूर्ला वासियांनी निर्धार केल्याने अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या सभेचे संचालन व आभार माजी ग्रा.प. सदस्य राजेश गोवर्धन यांनी केले. यावेळी गावातील महिला व पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत ग्रामस्थांचा दारूबंदीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:06 PM
तालुक्यातील जुनासुर्ला गावात दिवसेंदिवस अवैधरीत्या दारू विक्रीचे प्रस्थ वाढल्याने व्यसनाधीनता वाढत चालली आहे.
ठळक मुद्देजुनासुर्ला ग्रामसभेत ठराव : व्यसनाधीनता रोखण्यासाठी उपाय