नागभीड : तालुक्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५६ पैकी ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. पुरेशी गणपूर्ती हे यामागील कारण आहे. परिणामी प्रथमच ग्रामसभेला सामोरे जाणाऱ्या नवनियुक्त सरपंचांचा चांगलाच हिरमोड झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आल्यानंतर दीड वर्षानी प्रथमच ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी नागभीड तालुक्यात ग्रामसभा होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्तीअभावी या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सहा महिन्यांपूर्वी यातील ४३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या ग्रामपंचायतींच्या बहुतेक सरपंचांना ग्रामसोविषयी उत्सुकता होती. यात २१ महिला सरपंचांचा ही समावेश होता.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभांचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते.
आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शासनाकडून अनेक बाबींवरील निर्बंध हटविण्यात आले. यात ग्रामसभांचाही समावेश होता. विविध अटी आणि शर्तींचे पालन करून ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घ्याव्यात, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार या ग्रामसभा ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्तीअभावी या ग्रामसभा तहकूब कराव्या लागल्या. आता या तहकूब ग्रामसभा सप्टेंबर महिन्यात पार पडतील.
कोट
तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. यातील १५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा परिपूर्ण गणपूर्ती झाल्याने संपन्न झाल्या. बाकीच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गणपूर्तीअभावी होऊ शकल्या नाहीत. त्या ७ दिवसांच्या आत घेण्यात येतील.
- संजय पुरी, गटविकास अधिकारी नागभीड.