घनश्याम नवघडे
नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्यास लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देऊन आता ग्रामसभा घेण्यास अनुमती देण्यात आली असली तरी ग्रामसभांच्या आयोजनाबाबत अनेक अटी-शर्तीचे निर्बंध घालण्यात आले आहेत. अटी-शर्तीने विळखा घातलेल्या या ग्रामसभांबाबत जरा संदेहच व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्यास बंदी घालण्यात आली होती. शासनाने तसे आदेशच दिले होते. ग्रामसभेचे काही निर्णय मासिक सभेत घेण्यात येत होते. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शासनाकडून अनेक बाबींवरील निर्बंध हटविण्यात आले. आता यात ग्रामसभांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान १२ ऑगस्ट २०२१ रोजी शासनाने एक आदेश काढून ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने अनेक ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामसभा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, ग्रामविकास मंत्री यांनी ग्रामसभा या ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. या सूचनांनी ऑफलाइन ग्रामसभा घेण्यासाठी सुरू झालेल्या हालचाली पुन्हा थंडावल्या.
आता ग्रामसभा आयोजनाबाबतच्या हालचालींनी पुन्हा वेग घेतला आहे. नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेण्याबातच्या नोटीसही काढल्या आहेत व यातील बहुतांशी ग्रामसभा ३१ ऑगस्ट रोजी पार पडतील, अशी माहिती आहे. दरम्यान, शासनाकडून ग्रामसभा घेण्याबाबतचे निर्देश प्राप्त होताच या विषयावर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उभयतांमध्ये झालेल्या चर्चेनुसार कोविडविषयी वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करून ग्रामसभांच्या आयोजनास परवानगी प्रदान करण्यात आली आहे.
बॉक्स
पोलीस व आरोग्य कर्मचारी राहतील हजर
या ग्रामसभा शिस्तबद्ध पद्धतीने होण्याच्या दृष्टीने ग्रामसभेला पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर राहण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामसभेस आशा कार्यकर्तीच्या उपस्थितीवर भर देण्यात आला असून ग्रामसभेस उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिमीटर व थर्मलगनने तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.