लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा चंद्रपूरच्या नेतृत्वात असहकार आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याने हे आंदोलन स्थगित केले होते.
परंतु, सोडवणूक न झाल्याने पुन्हा असहकार आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेतर्फे अनेकदा निवेदन, आंदोलनामार्फत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी १८ ऑक्टोबर २०२२ पासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी युनियनसोबत बैठक झाली. तेव्हा १८ नोव्हेंबर २०२२ पूर्वी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा आंदोलन केले. तेव्हाही आश्वासन मिळताच आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आतापर्यंत मागण्याची सोडवणूक झाली नसल्याने ३० ऑगस्टपासून पुन्हा ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
असे आहे आंदोलनाचे स्वरूप जिल्हा परिषद व पंचायत समितीने बोलावलेल्या सर्व आढावा सभांवर बहिष्कार, ग्रा. पं. चे विकास कामाचे व प्रगती अहवाल (जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू, ब्लिचिंग पावडर, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक आदी वगळून) देण्यात येणार नाही, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड दफ्तर तपासणी (लेखा परीक्षण वगळून) उपलब्ध केल्या जाणार नाही. जि. प. व पं. स. च्या अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती फोनद्वारे देण्यात येणार नाही. ग्रामसेवकांची विकासकामे नियमित सुरू राहतील.
"जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या निकाली न काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, जि. प. प्रशासनाने समस्या निकाली न काढल्याने मागील एक वर्षापूर्वी स्थगित केलेले असहकार आंदोलन ३० ऑगस्टपासून पुन्हा सुरू केले आहे. आताही मागण्या न सोडविल्यास ९ सप्टेंबरला २ वाजता ग्रामसेवक संवर्ग पंचायत समिती स्तरावर धरणे, निदर्शने त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे." -प्रकाश खरवडे, अध्यक्ष राज्य ग्रामसेवक युनियन, चंद्रपूर