मासळ (बु.) : ग्रामपंचायतने २८ ऑगस्टला अवैध जिप्सीचा ठराव घेतल्याने संतापलेल्या कोलारा येथील ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. मंगळवारी सायंकाळी ५:१० मिनिटांनी ग्रामसेविकांनी पोलिस संरक्षणात कुलूप तोडून ग्रामपंचायत कार्यालय सुरू केले. मात्र, तणाव असून पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
कोलारा ग्रामपंचायतने अवैध जिप्सीचा ठराव घेतला होता. ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारण्यासाठी शनिवारी व रविवारी आमसभा झाली. सरपंच, ग्रामसेवक व सदस्य ग्रामसभेत उपस्थित राहून तोडगा काढतील, असे वाटले होते. मात्र, सरपंच व ग्रामसेवक संजय ठाकरे सभेत आले नाही. त्यामुळे ग्रामसभा रद्द झाली. संतापलेल्या ग्रामस्थांनी रविवारी रात्री १० वाजता ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले होते. मंगळवारी सायंकाळी ग्रामसेवकांनी पोलिस संरक्षणात कुलूप तोडून ग्रामपंचायत कार्यालय यांनी सुरू केले.
...अन् ग्रामपंचायतीलाच ठोकले टाळे! कमिटीच बरखास्त करण्याची मागणी
मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाचे कुणीच अधिकारी कोलारा येथे दाखल झाले नव्हते. मात्र, ग्रामसेवक संजय ठाकरे यांनी संवर्ग विकास अधिकारी संजय राठोड यांच्याशी चर्चा केली. या चर्चेवरून पोलिसांचे सहकार्य घेत ग्रामसेवक ठाकरे व शिपाई दडमल यांनी ग्रामपंचायतचा कुलूप तोडून कार्यालय सुरू केले.
२७ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा
समस्येवर तोडगा काढण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याबाबत नोटीस काढण्यात आली. पोलिसांमार्फत गावात ध्वनिक्षेपकाद्वारे ही माहिती देण्यात आली. गावात पोलिसांचे दंगा पथक तैनात असून, कोलारा गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले.