आजी-नातवाच्या प्रेमाची अनोखी कहाणी
नीलेश झाडे
गोंडपिपरी (चंद्रपूर) : आजी-आजोबांचा लळा नातवांना असतोच. अशात गोंडपिपरी तालुक्यातील एका नातवाचे जगच आजीची कूस ठरली आहे. तब्बल १८ वर्षांपासून तो आजीच्या खांद्यांवर वावरतो. त्याचे सर्व अवयव निकामी झालेले आहेत. त्याच्या हावभावावरून त्याची गरज आजी ओळखते. नातवाला मायेची ममता देणारी ही आजी नंबर वन ठरली आहे. या आजीचे नाव आहे सुनीता दयालवार.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावाची संतनगरी अशी ओळख आहे. या गावातील आजीची पंचक्रोशीत चर्चा आहे. सुनीता दयालवार व सदाशिव दयालवार यांची मोठी मुलगी कल्पना हिचा विवाह मूल तालुक्यात येणाऱ्या सिंताळा येथील शरद कानमपेल्लीवार यांच्याशी झाला. त्यांचे पहिले अपत्य होते यश. यशचा जन्म झाला तेव्हा सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, या आनंदावर काळाने विरजण टाकले. जन्माच्या तिसऱ्या दिवशी यशला कावीळ आजार झाल्याचे निदान करण्यात आले. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात यशवर उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला यशच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही. यशचे वय वाढू लागले. मात्र, सामान्य बालकाप्रमाणे त्याच्या शरीराची तथा मेंदूची वाढ झाली नाही. तपासणीअंती यश पूर्णत: अस्थिव्यंग तथा मंतिमंद झाल्याचे निदान करण्यात आले. आई कल्पना, वडील शरद यांना यशचा मोठा जिव्हाळा होता. मात्र, यशने आजी सुनीता दयालवार यांचे हृदय जिंकले होते. काही वर्षे आई-वडिलांकडे राहिलेल्या यशला आजीने घरी आणले. यशने आजीला चांगलाच लळा लावला होता. यशच्या हावभावाने त्याला काय हवे, काय नको हे आजी ओळखायची. यश स्वत:च्या पायावर उभा होऊ शकत नाही. त्याला नीट बोलताही येत नाही. सामान्य मुलाप्रमाणे तो शौच, लघवी करू शकत नाही. जन्मापासून आजतागायत आजीची कूस अन् खाट हेच यशचे जग झाले आहे.
बॉक्स
आजीलाही त्याच्यावाचून करमेना
आज यशचे वय १८ वर्षे झाले आहे. १८ वर्षांत यशने आजीच्या खांद्यावरच सर्वाधिक वेळ घालविला आहे. आई, वडिलांनी अनेकदा यशला सोबत नेण्याचा विचार केला. मात्र, आजी सुनीताबाईने प्रत्येक वेळी नकार दिला. आजही यश आजी-आजोबाकडेच आहे. आजी म्हणजे यशचा जीव की प्राण आहे. यश म्हणजे आजीसाठी जगण्याचा श्वास आहे. आजी - नातवाचे हे नाते पंचक्रोशीत चर्चिले जात आहे. या आजीकडे बघून आम्हालाही अशीच आजी लाभो असे गावातील नातवंडे बोलतात.
बॉक्स
आजोबा, मामा, मामीचाही लळा !
यशचे आजोबा सदाशिव दयालवार, मामा सुदर्शन, मामी संगीता यांनाही यशने लळा लावला. दयालवार आणि कानमपेल्लीवार परिवार यशची काळजी घेतात. या दोन्ही परिवाराच्या प्रेमानेच यशला जगण्याची ऊर्जा मिळत आहे.
290721\img-20210727-wa0024.jpg
यश