वरोरा : शासनाच्या वतीने नैसर्गिक मृत्यू झाल्यास निराधार लोकांना एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. कोरोनाकाळात अनेक निराधारांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनाही नैसर्गिक मृत्यू म्हणून एक लाख रुपयाचे अनुदान मिळावे, असा प्रस्ताव संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष मिलिंद भोयर यांनी या समितीच्या सभेत मंगळवारी उपस्थित केला.
सदर सभेमध्ये एकूण ३३१ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना, अशा सर्व प्रकरणांवर या सभेमध्ये चर्चा करून लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने बँकेत जमा करण्याचे ठरले. यापूर्वी हे सर्व अनुदान ओरिएंटल बँकेत जमा केले जात होते. मात्र, या बँकेचे विलीनीकरण झाल्याने अनुदान जमा होण्यास विलंब लागत असल्यामुळे यापुढे हे अनुदान ॲक्सिस बँकेमधून लाभार्थ्यांच्या खात्यात तीन ते चार दिवसांत थेट जमा होणार असल्याचे भोयर यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी कोणत्याही एजंटमार्फत अर्ज न करता सरळ समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी लाभार्थ्यांना केले.
या सभेला सचिव तथा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, नायब तहसीलदार मधुकर काळे, तसेच समितीचे सदस्य विशाल बदखल, अविनाश ढेंगळे, दिवाकर निखाडे, लक्ष्मण ठेंगणे, वसंत गायकवाड, यशोदा खामनकर उपस्थित होते. सभा यशस्वी करण्याकरिता सूर्यकांत पाटील, मधुकर दडमल, पद्मा लाकडे आदींनी सहकार्य केले.