पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीतील प्रकार
ब्रह्मपुरी : शेतकऱ्यांचे उन्हाळी धान खरेदी न करता बनावट धान खरेदीची कागदपत्रे जोडून अनुदान लाटण्याचा गैरप्रकार पिंपळगाव भोसले सेवा सहकारी सोसायटीने केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली असून योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात उन्हाळी धान पीक खरेदीकरिता शेतकऱ्यांनी आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती .मात्र, ब्रह्मपुरी तालुक्यात एकही आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. आधारभूत धान खरेदी सुरू होणार असे काही केंद्रावर सांगण्यात आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीकरिता सातबाऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली होती. धान विक्रीकरिता संबंधित ग्रेडरशी संपर्क साधला असता २०२०-२१ च्या खरेदीच्या खरीप धान साठ्यामुळे गोडाऊनमध्ये जागा नाही. असे सांगून धान खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नोंदणी केलेल्या एकाही शेतकऱ्याचे शासकीय धान केंद्रावर धानाची खरेदी केली नाही. मात्र, तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत संबंधित ७५ शेतकऱ्यांची सातबाऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली गेली व कुणाचीही धान खरेदी न करता सातबाऱ्यावर उन्हाळी धान खरेदी केल्याचे दाखवून अनुदान लाटण्याचा गैरप्रकार पिंपळगाव भोसले सेवा सहकारी सोसायटीने केल्याचे दिसून आले. येथील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांची भेट घेतली. शेतकरी व शासनाची दिशाभूल करून रब्बी धानाची आधारभूत खोटी खरेदी दाखवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगाव भोसले सेवा सहकारी सोसायटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी विलास उरकुडे,सुधीर दोनाडकर, टिकाराम ढोरे, विनोद दोनाडकर, बाळकृष्ण शेबे, हरी शेबे, गजानन ढोरे, हेमराज कांबळी, संतोष वाघधरे विलास कुथे, प्रमोद टिकले, विनोद कुथे व शेतकरी उपस्थित होते.