नागभीड :येथील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खोदून देण्यात आलेल्या शेतबोड्यांचे अनुदान दोन वर्षापासून मिळाले नसल्याची माहिती आहे.
परिणामी हे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. हे अनुदान या शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
नागभीड येथील तालुका कृषी कार्यालयाकडून २०१८ - १९ आणि २०१९ - २० या आर्थिक वर्षात तालुक्यात एकूण ३७ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेतबोड्या खोदून देण्यात आल्या. तालुक्यात धान पीक अंतिम टप्प्यात असताना पाऊस नेमका याचवेळी दडी मारतो आणि हातातोंडाशी आलेले धानपीक नेस्तनाबूत होते. अशावेळी या शेतबोड्यातील पाणी या धानपिकास कामी यावे या उद्देशाने या शेतबोड्या कृषी विभागाकडून खोदून देण्यात आल्या आहेत. या शेतबोड्या दोन प्रकारच्या असून काही शेतबोड्यांचे अनुदान २७ हजार ५०० रूपये तर काही शेतबोड्यांचे अनुदान ३८ हजार ९०० रूपये असल्याची माहिती आहे.
शेतात शेतबोडी खोदून झाल्यानंतर अनुदान मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता शेतबोड्या खोदून दोन वर्षाहून अधिक कालावधी होत असला तरी अद्यापही या शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार या ३७ लाभार्थ्यांपैकी केवळ चार शेतकऱ्यांना आतापर्यंत या शेतबोड्यांचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती आहे. उर्वरित ३३ शेतकरी अनुदानासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित असले तरी त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. या शेतबोड्या खोदण्यासाठी काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर तर काही शेतकऱ्यांनी जेसीबी मशीन भाड्याने घेतली होती. आता हे मशीन मालक शेतकऱ्यांना पैशाची विचारणा करीत आहेत.