वनमंत्र्यांचा पुढाकार : नागरिकांचा सहभाग वाढविणारचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने व वन विभागाने ५० कोटी वृक्षरोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे लोकचळवळीत रुपांतरित करुन यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प केला असून त्याकरिता महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हरित सेनेची सदस्य नोंदणी आॅनलाईन करण्यात येत आहे. खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ३१ मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.राज्यामध्ये १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागाने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट सहज ओलांडले गेले. प्रत्यक्षात एकाच दिवशी २.८३ कोटी वृक्ष लागवड झाली. लिमका बुक आॅफ रेकार्ड या संस्थेने या आगळ्या वेगळ्या आणि नाविन्य कार्यक्रमाची दखल घेतली आहे.जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतु बदल या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्के वरुन ३३ टक्केपर्यंत नेण्याचा भाग म्हणून वृक्षारोपणाची गती तुटू न देता त्यामध्ये सातत्य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याबाबत कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करण्याबाबतच्या आवश्यक सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शासनाच्या सर्व विभागांचा समावेश आहे.नियोजित ५० कोटी वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे जन चळवळीत रुपांतरित करुन यशस्वीरित्या राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र हरित सेना स्थापित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ॅ१ीील्लं१े८.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल या संकेत स्थळावर ३१ मार्च पर्यंत किमान १ कोटी लोकांनी स्वयंर्स्फूतीने स्वयंसेवक म्हणून उपक्रमाचे सदस्य म्हणून नोंदणी करावी, असे अपेक्षित आहे.ग्रीन आर्मीचे सदस्य असलेल्या सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्यजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्मानित करण्याची योजना विचाराधीन आहे. नोंदणीची पद्धत अत्यंत सोपी असून संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यानंतर सभासद नोंदणी झाल्याचे अािण त्यानुसार प्रमाणपत्र सिस्टिममध्ये तयार करुन सदस्याच्या मेल आयडीवर आणि एसएमएसवर पाठविले जाईल. जिल्ह्यातील विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबिय आप्तेष्ठ, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय आणि खाजगी संस्था यांनी महाराष्ट्र हरित सेनेमध्ये नोंदणी केल्यास त्यांना अशा उपक्रमात काम करण्याची संधी मिळेल.(शहर प्रतिनिधी)
वृक्ष लागवड व संगोपनासाठी आता हरित सेना
By admin | Published: February 10, 2017 12:47 AM