चंद्रपूर : विविध प्रकारच्या २६ प्रजातींच्या हिरव्याकंच ६५ हजार ७२४ रोपट्यांचा वापर करुन वनविभागाने रामबाग येथे ‘भारतमाता’ शब्दांची निर्मिती केली आहे. या अभिनव उपक्रमाची शनिवारी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंद झाली. चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. यात पर्यटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच विविध प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. वन कर्मचाऱ्यांनी वन्य प्रेमींच्या मदतीने तो प्रत्यक्ष साकारला. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
रोपट्यांचे उद्यान तयार होणार : - ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या नावाने वनविभागाने एक उद्यान साकारावे.- प्राप्त झालेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे, अशा सूचना वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र वन विभागाने आतापर्यंत चार ‘लिम्का रेकॉर्ड’वर मोहोर उमटवली. आता प्रथमच वनविभागाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केले आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. -सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय