मंगेश भांडेकर चंद्रपूरचंद्रपूर शहरातील अंतर्गत रस्ते तसेच मुख्य मार्गावर लहान व मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, अनेक दुुकानांच्या समोर वाहन पार्किंग व्यवस्थाच नसल्याने रस्त्यावरच वाहने सर्रासपणे उभी केली जात आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असला तरी ग्राहकांच्या गर्दीने मात्र व्यावसायीकांचा चांगलाच गल्ला भरत आहे. याकडे मात्र मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पार्किंग व्यवस्था नसणाऱ्या व्यावसायीकांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात आहे. गांधी चौकातील गोल बाजार तसेच बंगाली कॅम्प येथे मासोळी विक्री बाजारपेठ, सराई मार्केट, गंज मार्केटमध्ये भाजीपाला व्यावसायीकांचे दुकान आहेत. तर शहरातील मुख्य मार्गावरही लहान व्यावसायिकांनी आपली दुकाने, चहा टपऱ्या थाटल्या आहेत. मात्र, दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वाहन उभे करण्यासाठी दुकानासमोर जागाच नाही. त्यामुळे दुकानासमोरच मुख्य मार्गावर वाहन पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघात घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बंगाली कॅम्प येथे वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरुन दोन ग्राहकातच बाचाबाची झाली. दोघांनीही वाहन काढण्यास नकार दिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोघातील वाद मिटविल्याने वाहतूक पूर्ववत सुरु झाली. असाच प्रकार गोल बाजारातही घडला. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांतच वाद निर्माण होत आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम व्यावसायिकांच्या गल्ल्यावर पडत नसून त्यांचा गल्ला मात्र, दररोज भरतच आहे. महानगर पालिका प्रशासनाने व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करताना नियम ठरवून दिले आहेत. त्या नियमाच्या आधारेच बांधकाम करावे, अशा सुूचना आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पार्किंग व्यवस्था नसतानाही व्यवसाय सुरु असणाऱ्या अने इमारती शहरात आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक त्रास ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. लहान व्यावसायीकांसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन दुकान थाटले आहे. त्यामुळे या दुकानांसमोर वाहनांची गर्दी असते. वाहतुकीचे कोणतेही भान न ठेवता अनेकजण वाहने उभी करतात. वाहतूक पोलिसांचीही चांगलीच दमछाक होते. आता गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून पालिका प्रशासनाने पार्किंग व्यवस्था करावी.
गल्ला व्यावसायिकांचा, त्रास नागरिकांना
By admin | Published: August 30, 2014 1:17 AM