चंद्रपूर : जंगलचा राजा म्हणून वाघाची ओळख आहे. एकदा शिकार केल्यानंतर तो सावजाला सहसा सोडत नाही. मात्र, म्हशीला घाबरून या राजालाही शिकार सोडून धूम ठोकावी लागली. ही घटना ऊर्जानगर परिसरातील पाइपलाइन परिसरात घडली. यासंदर्भातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. विशेषत: या घटनेमुळे एकीच्या बळामुळे म्हशीचा जीव वाचला हे मात्र नक्की.
चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने देशविदेशातील पर्यटक येथे येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून वाघ आता गावांच्या दिशेने येत असल्याने मानव-वन्यप्राणी संघर्ष सध्या टोकाला गेला आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान, ऊर्जानगर पाइपलाइन परिसरामध्ये म्हशींचा कळप चरत असताना एका वाघाने शिकार करण्यासाठी म्हशींचा पाठलाग केला. यामध्ये एक म्हैस अलगद वाघाच्या तावडीत सापडली आणि खाली कोसळली.
दरम्यान, तिच्या नरडीचा घोट घेण्यापूर्वीच म्हशींचा कळप मागून धावत आला. यातील एका म्हशीने तर वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर वाघाच्या अंगावर धाऊन गेली. दरम्यान, म्हशींचा कळप मागून येत असल्याचे दिसताच जंगलचा राजा असलेल्या वाघाने शिकारीसाठी पकडलेल्या म्हशीला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. यासंदर्भातील व्हिडीओ एकाने काढला असून, व्हायरल केला आहे. यामुळे मात्र म्हशींच्या हिमतीची तसेच एकीच्या बळाची जोरदार चर्चा सध्या चंद्रपूरसह जिल्ह्यात सुरू आहे.
वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघ तसेच अन्य वन्यप्राणी आहेत. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वन्यप्राणी पाणी तसेच शिकारीसाठी गावांकडे धाव घेतात. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांची सुरुवात झाली असून, वन्यप्राणीही हळूहळू गावांच्या दिशेने येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऊर्जानगर पाइपपाइन परिसरातील आजची घटना तसेच वृंदावननगरमध्ये काही दिवसांपूर्वीच बिबट्याने एका घरातील श्वानावर हल्ला केला. तर लालपेठ परिसरातही एक अस्वल मुक्तसंचार करीत असताना अनेकांनी बघितले आहे.