दोन वेळेच्या जेवणाने भागविली जातेय भूक
प्रकाश काळे
गोवरी : माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही. कोरोना काळात पोटाची भूक भागविण्यासाठी नाइलाजाने कुणी पुढेही येत नव्हते. मात्र, आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने ‘आधार तरुणांचा’ हा ग्रुप कार्य करीत आहे. स्वाती मेश्राम हिच्या पुढाकारातून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवण देत नवा आदर्श घडविला जात आहे.
राजुरा येथील स्वाती ऋषी मेश्राम (२५), असे कोरोनाबाधितांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या युवतीचे नाव आहे.
कोरोनाने केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांना जेवणासाठी भटकंती करावी लागत आहे. अशावेळी रुग्णांची आणि नातेवाइकांची होणारी गैरसोय पाहून राजुरा येथील २५ वर्षांच्या स्वाती मेश्राम हिला एक कल्पना सुचली. या कल्पनेतून तिने आपल्या संपर्कातील काही युवा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप बनविला आणि या ग्रुपला ‘आधार तरुणांचा’ नाव देऊन यामध्ये सर्वांना जोडून घेतले. सुरुवातीला स्वतःहून स्वाती पुढे आली, कुणाकडूनही कसल्याही प्रकारची मदत न मागता स्वतःच्या घरून जसे जमेल तसे डबे पुरवीत होती. त्यानंतर आधार तरुणांचा ग्रुप तयार झाला. या सेवाभावी कार्यासाठी मित्रांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आणि सहकार्य मिळाले. बरेच लोक आधार तरुणांचा या ग्रुपला सहकार्य करू लागले. आतापर्यंत आधार तरुणांचा या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो रुग्णांचा आणि नातेवाइकांना राजुरा परिसरात दोन वेळचे जेवणाचे डबे मोफत पुरविले गेले आहेत. आणि हे काम सातत्याने सुरू आहे.
बॉक्स
तरुण भरकटलेला नाही
तरुणांकडे आज समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आजचा तरुण सोशल मीडियामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. तो सामाजिक जाणिवेपासून कोसो दूर गेला आहे, असे म्हटले जाते; परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत स्वाती मेश्राम यांनी सुरू केलेला उपक्रम आजचा तरुण भरटकलेला नाही, हे दाखवीत आहे. त्यांच्या या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद आहे.