चंद्रपूर -रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार गहू व हरभरा मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) ५९९ क्विंटल गहू आणि ६७० क्विंटल असे एकूण १ हजार २६९ क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपर्यंत हे बियाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्याने खरीपासोबतच आता रब्बी हंगामाकडेही शेतकरी लक्ष देऊ लागला. केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता अन्य पिकांकडेही शेतकरी आकृष्ट झाला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कडधान्याच्या लागवड क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु, पारंपरिक बियाणे वापरल्याने अनेक शेतकºयांना दरवर्षी आर्थिक फ टका बसतो, हे लक्षात घेऊन यंदा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) रब्बी हंगामासाठी ५९९ क्विंटल गहू आणि ६७० क्विंटल हरभरा बिजोत्पादनासाठी देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रांत होण्याची आशा निर्माण झाली आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना गहू प्रति क्विंटल ५० टक्के अनुदान आणि हरभरा बियाणेसाठी ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यात १ लाख २४ हजार ४०० हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्टरब्बी हंगामाकरिता महाबीजकडून राज्यातील २७ जिल्ह्यांत ८० हजार क्विंटल गहू आणि ३३ हजार क्विंटल हरभरा बियाणे केवळ बिजोत्पादनासाठी पुरविण्यात येणार आहे. हे बियाणे १ लाख २४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांत लागवड करण्याचे उद्दिष्ट महाबीजने पुढे ठेवले आहे.