ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : कलावंताची इच्छाशक्ती प्रबळ असते. जिथे कुणी पोहचत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहचते. चंद्रपूरच्या हौशी कलावंताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या मातोश्रीसोबतचे तैलचित्र रेखाटले. हे तैलचित्र त्यांना थेट पंतप्रधानांच्याच हातात द्यायचे होते. मात्र वाटेत विघ्नच विघ्न. पंतप्रधानांची भेट घेणे हे सोपे नाही, हे कळल्यावर या कलावंताने आपली इच्छा राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी लगेच पंतप्रधानांसोबत भेट घडवून आणत त्यांची इच्छा पूर्ण केली.चंदू पाठक असे या हौशी कलावंताचे नाव. देशातील महानुभावांचे तैलचित्र रेखाटणे आणि त्यांना ते स्वत: च्या हाताने भेट देत त्यांचा अभिप्राय मिळविणे, हा चंदू पाठक यांचा छंद. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, माजी राष्टÑपती अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तब्बल ३९ महानुभावांचे तैलचित्र त्यांनी रेखाटले व भेट दिले आहे.चंदू पाठक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांचे तैलचित्र रेखाटले. मोदींच्या मातोश्री मोदींना आशीर्वाद देत असतानाचे हे चित्र कुंचल्याचा अविष्कारच. मात्र हे तैलचित्र थेट पंतप्रधानांना द्यायचे कसे, असा प्रश्न पाठक यांच्या पुढे होता. त्यांनी २२ नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत: पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून पंतप्रधानांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर पाठक यांनी काही लोकप्रतिनिधींनाही विनंती केली. मात्र कुणीच त्यांची पंतप्रधानांसोबत भेट घडवून आणू शकला नाही. अखेर चंदू पाठक यांनी राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपली इच्छा व्यक्त केली. पाठक यांची इच्छा साधी नव्हती. पण आपल्या लाडक्या चंद्रपूरकरांची इच्छा पालकमंत्री मुनगंटीवार पूर्ण करणार नाही, हे शक्यच नाही.त्यांनी लगेच स्वत: २५ जानेवारी २०१८ ला पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून पाठक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली. १९ मार्चला पाठक यांनी अपायमेंट मिळाली. मात्र पाठक कधी दिल्लीला गेले नाही. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात एवढ्या मोठ्या सुरक्षा यंत्रणा पार करीत जायचे कसे? ते घाबरले. त्यांनी ना. मुनगंटीवारांसमोर ही भीती व्यक्त केली. ना. मुनगंटीवारांनी लगेच चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे व प्रदीप आलूरवार यांना पाठक यांच्यासोबत दिल्लीला रवाना केले. १९ मार्चला चंदू पाठक यांनी पंतप्रधानांची भेट घेत त्यांना तैलचित्र प्रदान केले.
पालकमंत्र्यांनी पूर्ण केली कलावंताची इच्छा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:50 PM
कलावंताची इच्छाशक्ती प्रबळ असते. जिथे कुणी पोहचत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहचते. चंद्रपूरच्या हौशी कलावंताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या मातोश्रीसोबतचे तैलचित्र रेखाटले.
ठळक मुद्देतैलचित्र दिले : चंद्रपूरच्या चित्रकाराची पंतप्रधानांसोबत भेट