राजेश भोजेकर, चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. सन 2013, 2020 तसेच 2022 मध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मात्र इरई नदीला पूर आल्यानंतर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात गत 20 वर्षात कधीही पाणी पोहचले नाही, असा एम.आर. सॅकचा अहवाल आहे. त्यामुळे वास्तविक स्थिती लक्षात घेऊन प्रात्यक्षिक सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री आणि जुजबी सर्व्हेचा आधार घेतला तर शहराचे नुकसान होईल आणि अवैध बांधकामे वाढतील. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पुन्हा एकदा वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करावे, अशा सुचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
नागपूर येथील हरिसिंग वनसभागृहात इरई नदी पूर नियंत्रण रेषा निश्चितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. , जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता पद्माकर पाटील, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते. पूररेषा दर्शक नकाशानुसार चंद्रपूर शहरातील निळी पूररेषा बाधित क्षेत्र हे सुमारे 450 हे.आर. आहे. चंद्रपूर शहर हे तिनही बाजुंनी जंगलाने वेढलेले असल्याने शहराच्या विकासासाठी हेच क्षेत्र शिल्लक आहे. आता या क्षेत्रातील विकास परवानग्या थांबविण्यात आल्यामुळे या क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकामे सुरू झाली आहेत. कोणत्याही नदीची पूररेषा ठरविणे ही पाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रातील बाब असून त्यासंबंधी सर्व्हेक्षण करणे, प्रतिकृती अभ्यास करणे, नकाशा तयार करणे व मंजूर करणे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. नदीच्या पूररेषा संदर्भाने सर्व्हेक्षण किंवा प्रतिकृती अभ्यास करणे ही बाब चंद्रपूर महानगर पालिकेच्या अधिकार क्षेत्रातील नसून याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त नाही.
दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीच्याअनुषंगाने 2 ऑगस्ट 2013 व 15 जुलै 2022 रोजीचा इरई नदी पूररेषेचा मायक्रोवेव सॅटलाईट डाटा तसेच नकाशा प्राप्त करण्याकरीता एम.आर.सॅक नागपूर यांना शुल्क अदा करण्यात आले आहे. एम.आर. सॅकचे संचालक यांच्याकडून प्राप्त नकाशानुसार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पूर रेषेबाबतचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.