देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा, सोंडो परिसरातील मुख्य खरीप पीक कापूस असून कापूस पिकावरील कीड व विविध रोगांबाबत उपाययोजना करण्यासाठी देवाडा व सोंडो येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गाव सभा घेण्यात आली.
या सभेत कापूस पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता कीड व रोग नियंत्रणाच्या पद्धती, पिकांची नुकसान पातळी कशी ठरवावी, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कसा करावा, बोंडअळी, बोंडसड याकरिता शिफारस केलेले कीटकनाशकाची नावे व त्याचे वापरावयाचे प्रमाण, कामगंध सापळे, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई पंधरे यांच्या हस्ते कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले यांनी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण यांनी बोंडसड याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच कृषी पर्यवेक्षक नितीन कांबळे, कृषी सहायक जी.व्ही. सडमेक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.