गोवरी : राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील बोटगाव येथे शेतकरी मेळावा पार पडला. मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यात आली. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील प्रेमनाथ परसुटकर, शेतकरी लहु बोंडे, मिनानाथ परसुटकर, बबन देवतळे, बबन जानवे, बाबुराव चहारे उपस्थित होते.
कडाक्याची ऊन, वारा किंवा पाऊस असेल तरीही जगाचा पोशिंदा शेतात काम करीत असतो.२३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने बोटगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे उत्पादक व्यवस्थापक विशाल भोगावार, अंबुजा फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी गोपाल जंबुलवार, रुपेश गेडेकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालन अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रकल्प क्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर यानी तर आभार नरेंद्र चहारे यांनी मानले.