ब्रह्मपुरी : बहुचर्चित गुंठेवारी प्रकरणात बुधवारी पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किशोर बालाजी कानझोडे (३१), रविंद्र गोपाळा कानझोडे (३५), पांडुरंग सीताराम कानझोडे (६८), निशांत गजाननराव बुरले (३७) चौघेही रा. ब्रह्मपुरी व अनिल वामनराव नाकाडे (४४) रा. काहली यांचा समावेश आहे.ब्रह्मपुरीतील गुंठेवारी प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. गुंठेवारी अधिनियम २००१ चा चुकीचा अर्थ लावत येथील ७२ एकर भूखंडाचे ४९ ले-आऊट पाडून खोटे दस्ताऐवज तयार करुन अधिकारी, नगरसेवक, व बिल्डर यांनी अकृषक जमिन केली. त्यामुळे शासनाला व नागरिकांना करोडो रुपयांनी फसविले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी हेमंतकुमार खराबे यांची नियुक्ती तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी डहाळकर यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती. तपासामध्ये आतापर्यंत ५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हे प्रकरण थांबले, असा समज असताना बुधवारी पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली. या घटनाक्रमाला अनुसरुन हेमंतकुमार खराबे यांनी या प्रकरणाविषयी माहिती देतांना सांगितले, तीन अधिकारी तीन नगरसेवक, सात भूखंडमाफीया अशा १३ आरोपींवर आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत ४० आरोपींपैकी १७ आरोपींचे आरोपपत्र ब्रह्मपुरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात पडताळणीसाठी पाठविले आहे. या प्रकरणात पुन्हा आरोपी सापडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. एकूणच हे प्रकरण पुन्हा उसळून आल्याने गुंठेवारी प्रकरण कोणत्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही. थंडबस्तात हे प्रकरण असल्याचे वाटू लागले होते. परंतु तपास अधिकाऱ्यांच्या तत्परतेने हे प्रकरण पुन्हा नवीन वळण घेणार असल्याचे बुधवारच्या प्रकारावरुन दिसून येते. अटकेतील पाचही जणांना तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची सुटका केली. (तालुका प्रतिनिधी)
गुंठेवारी प्रकरणात पुन्हा पाच आरोपींना अटक
By admin | Published: April 09, 2015 1:13 AM