प्रशासनाची उदासीनता : अठराविश्व दारिद्र्य अधिकाऱ्यांना दिसेना गुंजेवाही : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गुंजेवाही (बेघर) येथील विक्रम जानबा आदे हे अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत आहेत. त्यांनी घरकुलासाठी प्रशासनाकडे अर्ज केला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ते आजही घरकुलापासून वंचित आहेत. त्यांच्या घराची चौकशी करून त्यांना अत्यावश्यक घरकूल मंजूर करून द्यावे, मागणी जोर होत आहे.विक्रम जानबा आदे हे एका लहान मुलाला घेवून गेल्या कित्येक दिवसांपासून गुंजेवाही (बेघर) येथील कुडामातीच्या गवताच्या पडक्या घरात वास्तव्य करीत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून वारंवार घराच्या मागणीसाठी पंचायत समिती येथे येरझारा मारल्या. त्याची दया येऊन संबंधित विभागाचे अधिकारी त्याच्या दारी येऊन पाहणी केली तेव्हा, त्याचे मन हेलावून गेले. त्यांनी आश्वासन दिले की जेव्हा ओबीसीची यादी येईल तेव्हा अगोदर आपल्यासाठी घरकुलाची व्यवस्था केली जाईल. परंतु दोन-तीन महिने लोटूनही घर मंजूर न झाल्याने ते हतबल झाले आहेत. आदे परिवार त्याच कुडायातीच्या पडक्या घरात वास्तव्य करीत असून तो घर केव्हाही कोसळेन याची भीती आहे. या भीतीने पोट भरण्याचे त्याच्याजवळ साधन नसल्याने जीवन जगायचे कसे, हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्या घराच्या कुडाच्या भिंती पूर्णपणे पडक्या अवस्थेत असल्याने या घराची विल्हेवाट लागली असून येत्या पावसाळ्यात या घराची पूर्णपणे पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या हप्त्यात घरावरील गवत उडल्याने त्याची स्थिती नकोशी झाली होती. असे असतानाही शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे आदे यांना घरकूल मंजूर झाले नाही. या गावात अनेक आर्थिकदृष्ट्या सदृढ असलेल्या कुटुंबांना घराची अवस्था चांगली असतानासुद्धा घरे मंजूर करून बांधकाम करण्यात आले. परंतु सर्वांना त्या घराची अवस्था माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्याची अवस्था मरणाच्या दारात असल्यागत झाली आहे. याकडे आता तरी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन घरकूल मंजूर करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
गुंजेवाही येथील आदे कुटुंबाची घरकुलासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2016 2:45 AM