कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून गाजत आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेवर अनेक उच्च विद्याविभूषित तासिका तत्वावर किंवा महाविद्यालयात मोफत प्राध्यापकांचे काम करीत आहेत. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानासुद्धा महाविद्यालये सुरू करण्यात आली नाही. परिणामी या महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा तात्पुरता रोजगार बुडाला आहे. परिणामी अनेकांनी दुसरा रोजगार शोधला आहे तर काहीजण आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसायात काम करत असताना दिसून येत आहेत.
बॉक्स
नेट सेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
प्राध्यापक व्हावे म्हणून राज्य सरकारने नेट आणि सेट पात्रता परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील दहा वर्षांपासून भरती होत नसल्याने पात्रताधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सरकारने एक धोरण ठरवून किमान ३० हजार रुपये महिना सर्व तासिका तत्वावरील उमेदवारांना देण्याची गरज आहे.
बॉक्स
दहा वर्षांपासून लटकला प्रश्न
सहायक प्राध्यापकांचे तासिका तत्त्वावरील धोरण बंद करुन युजीसीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, अशी मागणी सीएचबी प्राध्यापकांनी केली आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रश्न लटकला आहे. आर्थिक तरतूद आणि वेगवेगळे तांत्रिक निकष यामुळे प्रश्न निकाली निघत नसल्याचा आरोप प्राध्यापकांकडून होत आहे.
बॉक्स
किती दिवस जगायचे असे
आज ना उद्या प्राध्यापक भरती होईल, या आशेवर मागील अनेक दिवसांपासून तासिका तत्वावर विद्याज्ञानाचे कार्य करीत आहे. मात्र कोणतेही सरकार आले तरी भ्रमनिरास होताना दिसून येत आहे. अनेकदा आंदोलन व मोर्चा काढून केवळ आश्वासन मिळाले आहे.
-प्राध्यापक
-----
आर्थिक स्थिती नसतानाही प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमएम बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले. आता महाविद्यालयात लाखो रुपयांचे डोनेशन मागितले जाते. डोनेशन भरायचे कुठून असा प्रश्न आहे. शासनाने सर्व महाविद्यालयासाठी प्राध्यापक भरती त्वरित करावी.
-प्राध्यापक
-------
प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक पात्रता असतानाही आम्ही तटपुंज्या मानधनावर विद्याज्ञानाचे कार्य करतो. कायमस्वरुपी प्राध्यापक तेच काम करीत असून लाखो रुपये वेतन घेतात. याला विषमता नाही तर काय म्हणावे. शासनाने त्वरित प्राध्यापक भरती राबविण्याची गरज आहे.
-प्राध्यापक