चार तास प्रचंड दहशत : शेतातील झाडावरच मांडले ठाण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील १२ कि.मी. अंतरावर असलेल्या गायडोंगरी गावात लागून असलेल्या लवाजी पेंदाम यांच्या शेतातील सागाच्या झाडावर चक्क बिबट्याने चार तास मुक्काम ठोकून गावकऱ्यांना भयभीत केल्याची घटना शुक्रवारला घडली.ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचे दर्शन अधुनमधुन होण्याचे प्रसंग घडत असतात. पण गायडोंगरी येथे बिबट्याने चक्क ठाण मांडल्याचा प्रकार परिसरात घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लवाजी पेंदाम यांच्या शेतात सागाच्या झाडावर बिबट दिसून आला. त्यानंतर चक्क रात्री १० वाजेपर्यंत बिबट्याने झाडावरच मुक्काम ठोकला होता. बिबट गावालगत असल्याची माहिती पसरताच आजुबाजूच्या रानबोथली, मेंडकी, जवराबोडी, मेंढा, तुलान, मेंढा आदी परिसरातील ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ही माहिती वनपरिक्षेत्राधिकारी व मेंडकी पोलीस स्टेशनला देण्यात आली असता लगेच त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु वनविभाग व गावकरी यांच्यात बिबट्यावरून वादविवाद निर्माण झाला. मात्र बिबट झाडावरून हटायला तयार नव्हता. बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती तर बिबट्याला उतरवून हाकलून द्यायचे असे वनविभागाचे म्हणणे होते. या भानगडीत बिबट चक्क चार तास झाडावरच होता. झाडावर चढण्यापूर्वी बिबट्याने गावातील एका व्यक्तीची शेळी फस्त केली होती. परंतु सुदैवाने शेळीजवळ असलेल्या १५ वर्षीय मुलाचे प्राण वाचले होते. शेवटी गावकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा आणला. परंतु बिबट्यानेच पळ काढल्याने संपुर्ण यंत्रणा व गाव शांत झाले. गावकऱ्यांच्या मनात अजूनही दहशत कायम असल्याने वनविभागाने गस्त करावी, अशी मागणी आहे.