चिमूर (चंद्रपूर) : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कुणाला डोकावूनही पाहू दिले जात नसताना, चक्क विनापरवानगी सफारी घडविणारे रॅकेटच सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ताडोबा कोअरच्या रामदेगी गेटवरील वनरक्षकासह एका एजंटला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात कलम ४२० व ४०९ अन्वये गुन्हा दाखल करून वनरक्षक टेकचंद सोनुले व एजंट सचिन काेयचाडे रा. खडसंगी (चिमूर) या दोघांवर अटक कारवाई केली आहे.
सचिन कोयचाडे हा एजंटचे काम करायचा. तो ताडोबात बुकिंग नसलेल्या पर्यटकांना हेरायचा. त्यांना पैशाच्या मोबदल्यात सफारीचे आमिष दाखवून त्यांना विशिष्ट जिप्सीत बसवायचे. ही बाब वनरक्षक टेकचंद सोनुले याला कळविली जायची. वनरक्षक सोनुले कर्तव्यावर असलेल्या रामदेगी गेटमधून बुकिंग वा परवाना नसताना कोणतीही नोंद न करता त्या जिप्सीला बिनदिक्कतपणे आत सोडायचा. अशा प्रकारच्या काही तक्रारी ताडोबा व्यवस्थापनाकडे प्राप्त झाल्या. या आधारे सापळा रचून मंगळवारी बनावट पर्यटकाच्या आधारे हे बिंग फोडले. याप्रकरणी ताडोबा कोअरचे वनपरिक्षेत्राधिकारी सतीश शेंडे यांनी थेट पोलिसात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
बाॅक्स
कुंपणच खात होते शेत
ताडोबामध्ये सफारीसाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागते. अनेकांना ठरलेल्या तारखेला बुकिंग मिळत नाही. कित्येक दिवस वेटिंगवर राहावे लागते. काही जण बुकिंग न करता थेट ताडोबात येतात. ही मंडळी ताडोबात सफारीसाठी नानाविध प्रयत्न करतात. शेवटी बफरची सफारी करतात. तेही जमले नाही तर मोहुर्ली गेटपासून परत जाण्याचा आनंद लुटतात. ही ताडोबाची महती आहे. परंतु रामदेगी गेटमधून अनधिकृतरीत्या पैसे घेऊन विनापरवानगी थेट कोअरमध्ये प्रवेश दिला जात असल्याची घटना उजेडात आल्याने, कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी पेंचच्या खुर्सापार गेटवर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती सूत्राने दिली.
अनेक दिवसापासून सुरू होता गोरखधंदा
वनरक्षक टेकचंद सोनुले व एजंट सचिन कोयचाडे हे दोघेही रामदेगी गेटपासून अगदी जवळ असलेल्या खडसंगी गावचे. या दोघांनी संगनमत करून त्यांनी हा गोरखधंदा सुरू केल्याची चर्चा आहे. रामदेगी गेटवर वनरक्षक सोनुले हा असायचा. या गेटमधून सहा जिप्सींना सहपरवानगी सोडता येते. मात्र सहापेक्षा कमी जिप्सी आल्याचे लक्षात येताच, हे दोघेही हौशी पर्यटकांकडून फोन पेद्वारे पैसे उकळून त्यांच्या जिप्सी ताडोबा कोअरमध्ये सोडत होता. हा प्रकार किती दिवसापासून सुरू होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.