शंकरपूर: येथील राजीव गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने येथे तीळसंक्रांतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मातांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.जी. पालांदुरकर, प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा कावळे, सीमा बावनकर उपस्थित होते. मकरसंक्रांतनिमित्त देण्यात येणाऱ्या ‘वाणा’चे औचित्य साधून उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माता-पालक व शिक्षकांमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊन विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्यात मोबाइलवरील ऑनलाइन शिक्षणाचे फायदे-तोटे, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या विविध समस्या व उपाय, यावर विचार मंथन या कार्यक्रमात करण्यात आले. ‘सौभाग्याचे लेणे’ हळदीकुंकू व वाण देऊन तीळगुळाच्या माधुर्याने उपरोक्त कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पद्मा भांडारकर यांनी केले.