चंद्रपूर :चंद्रपूर शहरातील दोन जिवलग मित्रांचे मृतदेह चंडीगडच्या सेक्टर ४३ मधील बसस्थानकासमोर (आयएसबीटी-४३) सेक्टर ५२ अंतर्गत कजेहडी गावाजवळील जंगलात एकाच झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची वार्ता पोहोचताच चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.
महेश हरिश्चंद्र अहीर (वय २४, रा. कोतवाली वार्ड जलनगर चंद्रपूर) व हरीश प्रदीप धोटे (२७, रा. बालाजी वार्ड चंद्रपूर) अशी मृतकांची नावे आहेत. महेश हा केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या आहे. चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांनी या घटनेची पुष्टी केली.
महेश आणि हरीश हे दोघे जिवलग मित्र होते. ते अचानक घरून बेपत्ता झाले. १५ मार्च २०२३ रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्याची माहितीही पोलिस निरीक्षक राजपूत यांनी दिली. बेपत्ता झाल्यापासून पोलिस तपासास लागले होते; मात्र दोघांनीही आपापले मोबाईल बंद करून ठेवले होते; परंतु ते दुसऱ्याच्या मोबाईलवरून घरी फोन करीत होते. याआधारे लोकेशन घेऊन तपास सुरू होता.
त्यांनी पहिला फोन ऋषिकेश येथून केला. त्यानंतर तेथून ते बेपत्ता झाले होते. नंतर पुन्हा ते कोठून फोन करतात या आधारे शोध सुरू होता. मात्र, ते फोन केल्यानंतर तेथून निघून जात होते. दरम्यानच्या काळात त्यांचे हसत खेळत फोटो येते होते. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे फोटो मिळाले तेही हसत खेळत असल्याचे दिसून येत. ही आत्महत्या असल्याचे पुराव्याच्या आधारे दिसून येत आहे. परंतु, त्यांची हत्या झाली वा आत्महत्या ही बाब उत्तरीय तपासणी अहवालातूनच स्पष्ट होईल, अशी माहितीही पोलिस निरीक्षक राजपूत यांनी दिली. चंडीगड पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे.