लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : विद्यापीठाची परीक्षा देण्यास निघालेल्या दोन जिवलग मैत्रिणींना राजुरा-गडचांदुर मार्गावर खामोना-आर्वी गावांदरम्यान अज्ञात वाहनाने चिरडून झालेल्या अपघातात दोन्ही युवतींचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. सगुणा भिवसन झाडे (२०) आणि अंजली नंदलाल मेश्राम (२०) (दोन्ही रा. निंबाळा) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. या घटनेत विशाल चिंचोलकर (२६, रा. चुनाळा) हा गंभीर जखमी झाला आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या सगुणा झाडे आणि अंजली मेश्राम या विद्यार्थिनी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी दुचाकीने निघाल्या. दरम्यान, राजुरा- गडचांदुर मार्गावर खामोना-आर्वीजवळ त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या चुनाळा येथील विशाल चिंचोलकर यांच्या दुचाकीची धडक बसली. या धडकेत सगुणा झाडे आणि अंजली मेश्राम या मैत्रिणी रस्त्यावरच कोसळल्या. दरम्यान, मागून येणारा अज्ञात ट्रक अंगावरून गेल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील विशाल चिंचोलकर रस्त्याच्या बाजूला पडल्याने थोडक्यात बचावला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांची घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली. त्यामुळे काही तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. घटनास्थळी राजुरा पोलीस दाखल झाल्यानंतर गर्दी पांगली. सगुणा व अंजली या मैत्रिणींना एकाच चितेवर सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. दोघींच्या दुर्दैवी मृत्यूने निंबाळा येथे शोककळा पसरली आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवासकोळसा भरून जास्त खेपा मारण्यासाठी मनमानी वेगाने ट्रक चालविल्या जात आहेत. त्यामुळे अपघातात होत आहेत. राजुरा-गडचांदूर मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यावर आळा घातला नाही तर पुन्हा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वेकोलिच्या विस्तारीकरणाचे बळी ?- राजुरा तालुक्यातील वेकोली कोळसा खाणीतून निघणारा कोळसा रेल्वे मार्गाने राजुरा- गडचांदूर रोडवरील पांढरपौणी येथील रेल्वे सायडिंगवर आणला जात होता; परंतु, वेकोलीच्या विस्तारीकरणासाठी हा रेल्वेमार्ग बंद करून संपूर्ण कोळसा पांढरपौणी येथील रेल्वे सायडिंगवर ट्रकद्वारे आणला जात आहे. त्यामुळे या मार्गावर रहदारी वाढली. रस्त्याच्या कडेला झुडपेही वाढली पण, कुणी लक्ष द्यायला तयार नाही.
दोन्ही कुटुंबांचे स्वप्न चक्काचूर- मुलींना उच्चशिक्षण देऊन आयुष्यात उभे करायचे, हे स्वप्न सगुणाचे वडिल भिवसन झाडे आणि अंजलीचे वडील नंदलाल मेश्राम यांनी पाहिले होते. - त्यासाठी मुलींना भक्कम पाठबळ देत होते. - त्यादेखील मन लावून शिकत होत्या. मात्र, अपघातामुळे या दोन्ही कुटुंबांचे स्वप्न चक्काचूर झाले.