राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे लघु, मध्यम व सूक्ष्म व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले. हे संकट पूर्णपणे केव्हा संपेल याची शाश्वती नाही. सर्वांच्या जगण्यावर काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत. हॉटेल व दुकानांसाठी जिल्हा प्रशासनाने आता रात्री १० वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, त्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले का, हा प्रश्न जागरूक ग्राहक विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील काही हॉटेल्सची पाहणी केली असता कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण करून घ्यावे, याबाबत हॉटेल चालक गंभीर नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर आहे. परंतु, कोरोना पूर्णत: संपला नाही. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा दीर्घकाळ बंदिस्त ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण या दोन्ही आघाड्यांवर सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. आतापर्यंत जिल्ह्यात ७ लाख ७८ हजार ७०७ नागरिकांनी लस घेतली. सोमवारी एकाच दिवशी विक्रमी ३५ हजार ६४६ जणांनी लस घेतल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपुरात ३५६ तर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. त्यामध्ये साडेचार हजार कर्मचारी काम करतात. मात्र, हॉटेलच नव्हे तर अन्य खासगी आस्थापनातील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली नाही, असा निष्कर्ष मनपाने नोंदविला आहे. हॉटेल मालकांनी लसीकरणासाठी तगादा लावल्यास १०० टक्के लसीकरण होऊ शकते, अशी माहिती एका ग्राहकाने लोकमतला दिली.
पहिला डोस घेतला तर दुसऱ्यासाठी वेळ नाही !
हॉटेल १
बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ३४ कर्मचारी काम करतात. त्यातील १७ जणांनी पहिला डोस घेतला. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. या हॉटेलमधील दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या १२ च्या वर नाही. लसीकरणासाठी वेळच मिळत नसल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली.
हॉटेल २
नागपूर व मूल मार्गावरील एक हॉटेल व धाब्यामध्ये १४ कर्मचारी काम करतात. त्यापैकी सहा जणांनी पहिला डोस घेतला. या डोसला तीन महिने होऊनही दुसरा डोस अद्याप घेतला नाही. लसीकरणासाठी वेळच मिळत नसल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली.
हॉटेलमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना चंद्रपूर मनपाने केल्या. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना माहिती दिली. निर्बंधामुळे हॉटेल बंद ठेवण्याच्या काळात काहींनी काम सोडले. सध्या कार्यरत असणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण केल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना सुट्टीही देत आहोत.-विवेक बोभाटे, हॉटेल व्यावसायिक, चंद्रपूर
डोस उपलब्धतेनुसार चंद्रपूर व जिल्ह्यात दरदिवशी लसीकरण सुरूच आहे. चंद्रपुरातील नागरिकांनी मनपा आरोग्य विभागाचे दैनंदिन वेळापत्रक पाहावे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही केंद्रांची माहिती दिली जात आहे. हॉटल व्यवसाय, उद्योग व सर्व खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर
रस्त्यांवर - टपऱ्यांवर आनंदी आनंद- प्राधान्य गटातील प्रत्येकाने न चुकता दोन डोस घ्यावे. लसीकरणासाठी केंद्रातून नागरिक एकदा परत आल्यास दुसऱ्यांदा जायला कचरतात. - वाट पाहून बराच उशिरा होतो व रोजगार बुडतो, अशी कारणे सांगितली जातात. काही हाॅटेल मालकही लसीकरणासाठी आग्रह धरत नाही. - हॉटेलमध्ये आता ग्राहकांची गर्दी वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक केले पाहिजे.