बल्लारपूर : लग्न जुळले व त्याच्या दरम्यान लॉकडाऊन लागल्यामुळे साक्षगंध तसेच लग्नाची तिथी निश्चित करण्यात अडचण आली. आता लॉकडाऊनमध्ये बरीचशी शिथिलता येऊन सर्व प्रकारची दुकाने खुली झाल्यामुळे साक्षगंध व लग्नाची तारीख ठरवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. लग्न जोडून आलेल्या घरी त्यांची तयारी सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्येही काही अटींसह लग्न समारंभ पार पडण्याची परवानगी मिळत होती. साधेपणाने व मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याची वधू-वर पक्षाची तयारी असली तरी लग्न कार्याकरिता लागणाऱ्या वस्तूंचे सोने - चांदीचे दागिने व कपडे इत्यादींची दुकाने बंद असल्यामुळे कार्यक्रम पार पाडणे शक्य नव्हते. आता सर्व प्रकारची दुकाने उघडल्याने त्या अडचणी दूर झाल्या आहेत. यामुळे मागे पडलेली लग्न कार्य करण्याच्या तयारीला सारे लागले आहेत. सोने - चांदी व कापडाच्या दुकानांमध्ये अनलॉकच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. कॅटरर्स, मंडप डेकोरेशन यांनाही आता लग्न कार्याची कामे मिळू लागणार असल्याने तेही कामाला लागले आहेत. जमावबंदी कायम असल्याने वरात काढता येणार नाही. त्यामुळे बँडबाजा वरात असला प्रकार मात्र दिसणार नाही. लग्न साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लावायचे आहे.
लग्न जुळलेल्या घरांमध्ये अनलॉकनंतर लग्नाची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:20 AM