विनायक येसेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंड्यातून बाहेर निघालेल्या एका पक्ष्याचे पिल्लू रस्त्याच्या कडेला पडले होते. त्याच्या आजूबाजूला कोणताही पक्षी नव्हता. जीव वाचावा म्हणून घरी आणले. वैद्यकीय उपचार केला. खाऊ-पिऊ घातले. लहान असल्याने काही दिवस घरातच ठेवले. घरातील संस्कार त्या पक्ष्यावर रुजू लागले. आता हा पक्षी घरातील एखाद्या मुलासारखाच घरात वावरतो. आंघोळ करतो. ताट-वाटीत जेवण करतो. पाणी पितो. भूक लागल्यावर जेवणही मागतो.विशेष म्हणजे हा पक्षी भ्रमंती करण्यास योग्य झाल्यानंतर त्याला कित्येकदा छतावर नेऊन बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो घरीच परत येतो.
भद्रावतीतील झिंगूजी वार्ड येथे राहणारे दिलीप मारुती नागपुरे यांना सुमठाणा परिसरात अंड्यातून निघताना हूडी जातीचा पक्षी दिसला. त्याच्या आजूबाजूला कोणतेही पक्षी नसल्याने त्यांनी त्याला घरी आणले. त्याच्यावर पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार केला व त्यानंतर त्याला खाण्यासाठी आंबील, वरणाचे पाणी खाद्य म्हणून दिले. चार-पाच दिवसातच हा पक्षी घरातच उडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर नागपुरे कुटुंबांना वाटले की आता हा पक्षी भ्रमंती करण्यास सक्षम झाला. कित्येकदा त्याला छतावरून उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही वेळातच पुन्हा घरी परत येऊ लागला. पक्षी असो की मुके जनावर एखाद्याला प्रेम दिलं तर तो खरोखरच आपलासा होतो. याचाच प्रत्यय यावेळी नागपुरे यांना आला.
भूक लागली की देतो आवाजआता या पक्ष्याला तब्बल सात महिन्यांचा कालावधी झाला असून त्याचा कुटुंबातील सदस्याप्रमाणेच घरात वावर आहे. भूक लागली तर विशिष्ट आवाज करतो. स्वयंपाक खोलीत जाऊन दिलेले जेवण करतो. पाणी पितो. त्यानंतर मुक्तपणे भ्रमंती करतो. काळोख होताच पुन्हा घरी परत येतो. नागपुरे यांनी त्याच्यासाठी जेवणाचे ताट, वाटी अशी व्यवस्था केली आहे. बाहेरगावी गेले तर तोदेखील सोबत येतो. नागपुरे कुटुंबाने त्याचे नामकरण केले असून त्याला आता ह्यडोमाह्ण या नावाने संपूर्ण वार्डात ओळखले जाते.