चंद्रपूर : राहत्या घरीच आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी धाड टाकून अटक केली. या कारवाईत एकास अटक करत ३० हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देविदास दिलीप पडगीलवार (३२, रा. दे. गो. तुकूम शिवाजीनगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर अविनाश हांडे (३७, रा. ताडबन वाॅर्ड, चंद्रपूर) याचा शोध सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून आयपीएल सुरू झाले आहे. यामध्ये चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सज्ज झाले आहे. दरम्यान, शिवाजीनगर राधाकृष्ण शाळेच्या मागे तुकूम येथील देविदास पडगीलवार हा इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या केकेआर विरुद्ध आरसीबी या क्रिकेटच्या मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाली.
पथकाने वरिष्ठांच्या आदेशान्वये छापा टाकला असता, एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाइलद्वारे सट्टा चालविताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोबाइल, टीव्ही, नगदी रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून देविदास पडगीलवार याला अटक केली. तर अविनाश हांडे हा फरार आहे. या दोघांवर कलम चार, पाच मु.जु.का, सहकलम १०९ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, पोकॉ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रवींद्र पंधरे आदिंनी केली.