स्कुटीवर उभारली मोबाईल पाणपोई : नागरिकांना मिळतोयं दिलासाचंद्रपूर : ४५ अंशापार झालेल्या तीव्र उन्हात तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या वाटसरूसमोर अचानक कुणी थंडगार आणि शुद्ध पिण्याचे पाणी घेऊन आले तर त्या वाटसरूच्या मनात समाधानाच्या लहरी उठतील. चंद्रपूर शहरातील तहानलेल्या वाटसरूंना तृप्त करण्याचे काम एक जलदूत करीत आहे. त्याचा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.सुनिल तिवारी असे त्याचे नाव. पेशाने पत्रकार असलेल्या सुनिल तिवारी यांनी चक्क त्यांच्या स्कुटीवर पाणपोई उभारली आहे. त्यासाठी स्कुटीवर त्यांनी खास व्यवस्था करून घेतली आहे. या ना त्या कारणाने दररोज अनेकदा शहरातून फेरफटका होतो. तेव्हा स्कुटीच्या मागील बाजुला पाण्याची कॅन आवर्जून असते. त्यावर दोन प्लॉस्टीकचे ग्लासही असतात. ही कॅन ठेवण्यासाठी तयार केलेल्या चौकटीवर पाणी बचतीचा संदेशही दिला आहे. रस्त्याने जाताना एखाद्या वाटसरूने हात दाखविला की, ते थांबतात. तहानेने व्याकूळ झालेला वाटसरू मग या छोटेखानी पाणपोईतील पाणी पिवून तृप्त होतो. या मागे प्रसिद्धीचा कोणताही हेतू नाही. केवळ हे करताना मनाला समाधान मिळते, असे सुनिल तिवारी सांगतात. त्यांचे काका सत्यनारायण तिवारी यांनी आजवर २११ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या सामाजिक विचारातूनच मलाही सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)ओआरएस पावडरही असते सोबतसध्या खूप उन्ह तापत असल्याने अनेकांना उष्माघात होतो. ही बाब लक्षात घेऊन अलिकडे ओआरएस पावडरदेखील सोबत ठेवतो. रस्त्याने एखादा वाटसरू उष्माघाताने अशक्त झालेला दिसला तर लगेच त्याला सुनिल तिवारी ओआरएस पावडर पाण्यात टाकून पाजतात. त्यातून वाटसरूला दिलासा मिळतो. चंद्रपूर शहर हे ‘हॉट सीटी’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी चंद्रपुरात ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जात असे.परंतु अलिकडे पाणपोईंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वाटसरूंना तृष्णातृप्तीसाठी भटकावे लागते. ही गरज लक्षात घेऊन आपल्याला ही मोबाईल पाणपोईची कल्पना सुचली. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे.-सुनिल तिवारी, सामाजिक कार्यकर्ते
तहानेने व्याकूळ वाटसरूंसाठी ‘तो’ ठरला जलदूत
By admin | Published: May 24, 2016 1:18 AM