लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पिकांवर फवारणी करताना आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी मेंडकी ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय शिबिरात दिला.कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कपाशी पिकावरील बोंड अळीचे नियंत्रणाकरिता शेतामध्ये कामगंध सापळे उभारणी करून एकात्मिक पद्धतीने कीड व रोगाचे नियंत्रण करणे, धान व तूर पिकावरील किड व रोगाची माहिती देवून नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना सूचविणे, किटकनाशके फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी घ्यायची दक्षता व कृषी विभागातंर्गत विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, मेंडकीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व शेतकरी उपस्थित होते.कृषी अधिकारी निलेश भोयर यांनी पिकांवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाकरिता शेतामध्ये कामगंध सापळे उभारणी याबाबत मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी मंगेश मेश्राम, कृषी विस्तार अधिकारी दिनेश आत्राम, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सोनाली लोखंडे यांनी शेतीपूरक व्यवसाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आयोजनासाठी कृषी विस्तार मुरलीधर लटये व अन्य कर्मचाºयांनी यांनी सहकार्य केले.
पिकांवर फवारणी करताना आरोग्याची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:52 AM