चंद्रपूर : बऱ्याच कालावधीनंतर आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी अर्ज सादर केले आहेत. परीक्षार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रशासनातर्फे आरोग्य विभाग भरतीसंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम राबवावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन शिबिर राबविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच धरतीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हा उपक्रम राबवावा, अशी मागणी होत आहे.
वन्यप्राण्यापासून काळजी घ्यावी
चंद्रपूर : शेतात काम करताना वन्याप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे शेतात जाताना किंवा शेतात काम करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाल्यापासून जिल्हाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
अंधश्रद्धेबाबत जनजागृती करण्याची गरज
चंद्रपूर : महिनाभरात अंधश्रद्धेच्या कारणावरून मारहाण करण्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे मूळ पसरले आहे. त्यामुळे भानामती, काळी जादू आदी कारणांनी मारहाणीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.
बँकांतील पासबुक प्रिंटिंग बंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बँकांतील पासबुक प्रिंटिंग मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना जमाखर्चाचा अंदाज येण्यास अडचण जात आहे. प्रशासनाने दखल घेऊन पासबुक प्रिंटिंग मशीन दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे. आता संपूर्ण व्यवहार डिजिटल झाले आहेत. पासबुकवरही ऑनलाइन पद्धतीनेच प्रिंटिंग करण्यात येते. मात्र, अनेक बँकांतील प्रिंटिंग मशीन बंद आहेत.
संगणक प्रशिक्षण देण्याची गरज
चंद्रपूर : सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील काम डिजिटल झाले आहे. मात्र, अद्यापही अनेक कर्मचाऱ्यांना संगणकाची कामे व्यवस्थित येत नाही. छोट्याशा कामाला बराच कालावधी लागतो. त्यामुळे कामे पूर्ण होण्यास नागरिकांना बराच वेळ विलंब करावा लागतो. त्यामुळे ज्यांना संगणकाचे परिपूर्ण काम येत नाही. अशांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सिव्हिल लाइनमध्ये विजेची समस्या
चंद्रपूर : येथील सिव्हिल लाइन परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. सिव्हिल लाइन परिसरात अनेक प्रतिष्ठित कुटुंबे वास्तव्यास राहतात. त्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याची ओरड होत आहे.