शिवानी वडेट्टीवार : वासेरा येथे नेत्र तपासणी व शस्रक्रिया शिबिर
वासेरा : नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ आरोग्य राखणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने आरोग्य हीच संपत्ती आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांंनी केले.
वासेरा येथील नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व आरोग्य शिबिर रविवारी जिल्हा परिषद शाळा वासेरासमोरील पटांगणात पार पडले. या शिबिराचे आयोजन लायन्स क्लब चंद्रपुर प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा, श्री गुरुदेव सेवा मंडळ वासेरा, रमाकांत लोधे मित्रपरिवार यांनी केले होते.
शिबिरात एकूण २२४ रुग्णांनी तपासणी करून घेतली. यावेळी सभागृहाचे भूमिपूजन शिवानी वडेट्टीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी वासेरा येथील नवनियुक्त सरपंच महेश बोरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिबिराचे आयोजक रमाकांत लोधे, मंदा मुनघाटे, गिरधर नाकाडे, महिंद्र सूर्यवंशी, परशुराम पाटील बोरकर उपस्थित होते. प्रास्ताविक रमाकांत लोधे यांनी, तर सूत्रसंचालन मंगेश मेश्राम यांनी केले. आभार गिरधर नाकाडे यांनी मानले.