लाेकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका कष्टी व आरोग्य सहायक शीला कराळे यांच्या दुर्लक्षामुळे २,७०० लसी गोठल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने शीला कराळे यांना २१ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले. मात्र, शीला कराळे यांचे निलंबन अन्यायकारक असल्याने ते मागे घेण्यात यावे, यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी म.रा. जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघ चिमूर तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी पंचायत समिती चिमूर येथे आंदोलन केले. निलंबन मागे न घेतल्यास, २३ ऑक्टोबरपासून तालुक्यातील कोविड लसीकरणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सहायक बीडीओ सरोज सहारे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.लस गोठण्याच्या प्रकरणात भिसी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका कष्टी यांच्यावरही कार्यवाही होणे अपेक्षित होते, पण त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता एकतर्फी कार्यवाही करत, शीला कराळे या कनिष्ठ कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले. १२ ऑक्टोबरला तीन परिचारिकांनी सायंकाळी उर्वरित कोविड १९ लसी आयलर मशीनमध्ये ठेवल्या होत्या. त्या १३ ऑक्टोबरला डीप फ्रीझर मशीनमध्ये कशा पोहोचल्या, या मुद्द्याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. संबंधित तीन परिचारिकांचे बयानही नोंदविण्यात आले नाही. आरोग्य सहायक पदावर भिसी प्रा.आ.केंद्रात चार महिन्यांपूर्वी पुरुष आरोग्य सहायकाची नियुक्ती झाली असताना, पुरुष आरोग्य सहायकाला रुजू न केल्याने सगळी जबाबदारी आरोग्य सहायक शीला कराळे यांच्यावर देण्यात आली. त्यांच्यावर कामाचं प्रचंड ओझं लादलं. परिणामी, त्यांचे मानसिक संतुलन व आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम झाला. त्यामुळे सदर प्रकरणात वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ प्रशासनही जबाबदार आहे. कारण पुरुष आरोग्यसेवकाला वेळीच रुजू करून घेतले असते, तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असा आरोपही आरोग्य कर्मचारी संघटनेने केला आहे. यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे चिमूर तालुका अध्यक्ष चेतन संगेल, उपाध्यक्ष ललिता पत्तीवार, आर.पी. भटेले, सचिव व्ही.पी. दातीर, संघटन कार्य प्रमुख बबन गायकवाड, तालुक्यातील परिचारिका, मलेरिया वर्कर व अन्य आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.