बल्लारपूर : गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बल्लारपूर शहराला वादळी पावसाने चांगलेच झोडपले. गुरुवारी २८ मि.मी., तर शुक्रवारला ६६ मि.मी. पाऊस बरसला. याची नोंद झाली आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजता वादळासह पावसाने हजेरी लावली. विजेचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह पाऊस एक तासभर दमदारपणे बरसला. काही वेळ विद्युत गुल राहिली. याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान झाली. वादळ आणि पाऊस मोठाल्या सरींनी राहून राहून रात्री आठ वाजेपर्यंत बरसत राहिला. वारा भरभरून वाहू लागल्या. पावसासोबत हलक्याशा गाराही पडल्या. काही वेळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला. बरेच दिवसांनंतर बल्लारपूरवासीयांना मोठा पाऊस बघायला मिळाला. दोन दिवसांच्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा आला आहे. वातावरण ढगाळच आहे. या वादळी पावसात काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या. वादळाने जांभूळ, आंबे या फळांची पडझड झाली आहे. वादळी पावसामुळे कुठे काही हानी झाल्याचे वृत्त नाही. परत पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे.