जिवती : गुरुवारी सायंकाळपासून पडलेल्या संततधार पावसाचे पाणी जिवती शहरातील काही घरात तसेच काही दुकानांत शिरल्यामुळे दुकानांतील वस्तू वाहून गेल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अनेक घरांचीसुद्धा पडझड झाली आहे.
जिवती शहरातील शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला आहे. या नाल्यावर रात्रीच्या जोरदार पावसामुळे पूर आला. नाल्याला लागूनच असलेल्या जांबळे रेडिमेट कापड दुकान, दर्शन फोटो स्टुडिओ, गोरे संगणक ग्राहक सेवा केंद्र आणि घोडके संगणक ग्राहक सेवा केंद्र या दुकानात पाणी शिरले. कापड दुकानातील सर्व कपडे वाहून गेले. एवढेच नाही, तर ग्राहक सेवा केंद्रातील संगणक व पीसीओसुद्धा निकामी झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवती तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून केली.