मूल : लाखो रुपये खर्च करून मूल येथील उमा नदीजवळील स्मशानभूमीचे काम व सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र नगर प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित कंत्राटदाराने पैशाच्या हव्यासापोटी निकृष्ठ काम केल्याने अल्पावधीतच येथील कामाची वाट लागली. त्यामुळे येथे विविध समस्या निर्माण झाल्या असून मृत्यूनंतरही नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे.नगर परिषद मूलच्या अधिपत्याखाली असलेली उमा नदीजवळील स्मशानभूमी विविध समस्यांनी ग्रासलेली आहे. या स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व इतर आवश्यक कामे करण्यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीपणामुळे संबंधीत कंत्राटदाराने पूर्णत: वाट लावली. लाखो रुपये खर्च केल्यानंतरही विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. स्मशानभूमीत बांधलेले टिनाचे शेड जीर्ण झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात टिनाला छिद्र असल्याने प्रेतावर पाणी पडत असल्याने ज्वलनाची क्रिया व्यवस्थित होत नाही. परिसरात बांधलेल्या खोल्याची दुरवस्था झाली आहे. सौंदर्यीकरणासाठी लावलेली झाडे करपली आहेत तर स्टाईल्स पूर्णत: फुटल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत आल्यानंतर नातेवाईकांना दु:खाची आठवण होऊ नये, असा परिसर स्मशानभूमीत असायला हवा होता. यासाठीच लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र भ्रष्टाचाराची किड लागल्याने स्मशानभूमी देखील यातून सुटली नाही. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी नाही. ‘मलमपट्टी’सारखी व्यवस्था रुग्णालयात सुरू आहे. आजारानंतर उपचार करण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असल्याने उपचाराला पाहिजे त्या प्रमाणात सोय उपलब्ध केली जात नाही. हिच स्थिती मृत्युनंतरही मूलच्या स्मशानभूमीत बघायला मिळत आहे. उपचाराला योग्य वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने त्रासलेल्या रुग्णांना एक प्रकारे ‘यम’च दिसत असतो. मृत्यूनंतर तरी चांगले अंतसंस्कार करता यावे, अशी आशा असताना मात्र स्मशानभूमीतील विविध समस्या बघता आजारपणापासून तर मृत्यूनंतरही नरक यातनाच सोसावा लागत असेल तर स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्षी देखील मानवाच्या मूलभूत गरजावर सक्रांत आल्याचे दिसून येते. याकडे नगर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात नरकयातना
By admin | Published: July 13, 2015 1:10 AM