लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू केली. शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविलेल्या या मोहिमेत तब्बल १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.दुचाकी वाहनचालकांच्या अपघातामध्ये विना हेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसाधारण नागरिकांवर कारवाई करण्यात येण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. यात १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर करुन करुन प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.