लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च सात लक्ष रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्यावरचा आर्थिक कमी करण्याच्या उद्देशाने खनिज विकास निधीतुन ५ लाख रुपयांपर्यंत इंजेक्शनच्या खर्चाला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ २९ मे पासून सुरू होणार आहे.म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या सर्व रुग्णांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना मान्यता देण्यात आलेली आहे. या अंतर्गत क्राइस्ट रुग्णालय व डॉ. वासाडे रुग्णालय या दोन खासगी रुग्णालयामध्ये ४० बेड कार्यान्वित करण्यात आले आहे. म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या आजाराकरिता रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहे. या रुग्णालयांत म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना उपलब्ध १९ पॅकेजेस अंतर्गत मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया पुरविण्यात येत असून ॲम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन शासनाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत पुरविण्यात येत आहे.