कारवाईचा फार्स : जिल्हा पोलीस अधीक्षकांची केली दिशाभूलचंद्रपूर: पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी अवैध दारू विरोधात कारवाईसाठी पाठविलेल्या पथकाने कारवाईसाठी चांगलेच नाट्य रंगविले. खुद्द पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळ झोकणाऱ्या या पथकाच्या कामगिरीवर आक्षेप नोंदवत सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. पोतनवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेऊन दारू तस्करांसोबत पोलिसांनी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. दारू तस्करीची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांचे पथक त्याच रात्री महाकाली परिसरात पाठविले. या पथकाने संबंधित तस्काराच्या घरी धाड टाकण्याची तयारी केली. रात्री ८ वाजताच्या सुमारास पोलीस पथक महाकाली परिसरात पोहोचले. मात्र, ज्या दारु तस्कराच्या घरावर धाड टाकावयाची होती, त्याच तस्कराला पोलिसांनी सोबत घेतले, असा आरोप किशोर पोतनवार यांनी केला आहे. सदर तस्कराच्या सांगण्यावरुन महाकाली परिसरातील कुमारस्वामी आणि एका सलून दुकान चालविणाऱ्या इसमाच्या घरावर या पोलीस पथकाने धाड टाकली. विशेष म्हणजे, दारू तस्करीची माहिती हा मुख्य तस्करच पोलीसांना देत होता. या परिसरातील नागरिकांनी हा प्रकार बघितला आणि पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, कुमारस्वामी यांच्या घरात दारू सापडली नाही. तो पानटपरी चालवितो. त्याच घराची तब्बल एक ते दीड तास तपासणी सुरु होती. दरम्यान सदर तस्कराने घरातील दारुसाठा इतरत्र हलविला. त्यानंतर सलूनचे दुकान चालविणाऱ्या इसमाच्या घरावर धाड टाकण्याचा फार्स करण्यात आला. तब्बल तीन तासांच्या कारवाईत या पथकाने परिसरातील एका व्यक्तीकडून १४ बाटल्या दारु जप्त केली, असा आरोप किशोर पोतनवार, प्रा. एस. टी. चिकटे आणि पुरोमागी महिला मंचच्या अध्यक्ष यशोधरा पोतनवार यांनी पत्रकार परिषदेत केला. ज्या तस्कराच्या घरावर छापा टाकण्यासाठी पथक पाठविण्यात आले, त्याच्यावर पोलिसांनी कारवाईच केली नाही. विशेष म्हणजे या मुख्य तस्कराच्या घरी त्याच दिवशी मोठा दारुसाठा उतरविण्यात आला होता. परंतु पोलीस विभागातूनच त्याला कारवाईची टीप मिळाली आणि त्याने साठा इतरत्र हलविला. जवळपास पाच लाख रुपये देऊन हे प्रकरणच दडपण्यात आल्याचा आरोप यावेळी पोतनवार यांनी केला. दारूसाठा भंडारा जिल्ह्यातील अड्याळ (पवनी) येथून येतो. यासाठी एका महिलेची भट्टी भाड्याने घेतली आहे. यासाठी वाटेतील बहुतेक ठाण्यांना दीड लाख रुपये महिना दिला जातो, असा दावा पोतनवार यांनी केला. (प्रतिनिधी)
दारू शोधण्यासाठी तस्कराची घेतली मदत
By admin | Published: June 03, 2016 12:54 AM