‘लोकमत’च्या बातमीची दखल : लोकवर्गणीतून झाली ८० हजारांची मदत आशिष घुमे। लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील हनुमान वॉर्ड येथील रवी पाटील यांची बहीण निशा प्रमोद माहिती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या मदतीसाठी तिचा भाऊ जनतेकडे आर्थिक मदत मागत आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने १८ मे रोजी ‘बहिणीच्या उपचारासाठी भावाची धडपड’ या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दाखल घेत अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी सरसावल्या असून छावा गृपच्या मदतीने गावकऱ्यांनी मदत रॅली काढून वर्गणी गोळा केली. यातून ८० हजार रूपये जमा झाले आहे.सर्वप्रथम वरोराचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी मदतीचा हात समोर करत १० रुपयाची मदत केली होती. हे वृत्तही ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेत ‘एक हाथ मदतीचा’ हा उपक्रम शहरात राबविण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून छावा ग्रुप वरोरा व एक हाथ मदतीचा आयोजन समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून मंगलवारला मदत रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे वरोराकरांनी नगदी व धनादेश स्वरूपात ८० हजार ९२ रुपये मदत केली . बाबुपेठ चंद्रपूर येथे राहणाऱ्या व वरोरा येथे माहेर असणाऱ्या निशाला बोनम्यारो नावाचा आजार असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र दानदात्यांच्या मदतीतून उपचार करणे तिला आता सोपे जाणार आहे. गोळा झालेली मदत कमीच असून आणखी दानदात्यांनी पुढे येऊन मदतीसाठी हात पुढे करावे असे आवाहन वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केले आहे. यासाठी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी काम करीत आहेत. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या पैशाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगने मोजणी अनेक सामाजिक संघटना लोकवर्गणी गोळा करतात. पण ‘एक हाथ मदतीचा आयोजन समिती व छावा ग्रुपने पारदर्शकतेचा उदाहरण लोकांसमोर ठेवला आहे. ६ जूनला निघालेल्या मदत रॅलीत एकूण ७ डब्यांमध्ये देणगी स्वीकारण्यात आली. मिळालेली देणगी ही इतरही लोकांना माहित व्हावी म्हणून सोशल मीडियाचा वापर करून फेसबुकवर लाईव्ह करून डब्बे खोलण्यात आले व पैशाची मोजणी करण्यात आली, हे विशेष !
‘त्या’ बहिणीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी काढली मदत रॅली
By admin | Published: June 08, 2017 12:38 AM