पेंढरी (कोके.) : आजच्या काळात सुखाच्या दिवसात मदत करणारे लोक खूप आहेत. परंतु, दु:खद प्रसंगी मदतीला धावून येणारे क्वचितच. पेंढरी कोकेवाडा येथे अजूनही चांगल्या प्रथा असून, गावात कुणाच्याही घरी कुणाचे निधन झाले तर संपूर्ण गाव त्या कुटुंबाच्या मदतीला तत्पर असते.
त्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जुळवाजुळव गावकरी स्वत: करतात. कुणी लाकडे जमा करतो तर कुणी इतर साहित्य. बाहेरगावावरून अंतिम संस्काराला आलेल्यांच्या जेवणाची व्यवस्था घरमालक करु शकत नाही. यावेळी ते उपाशी राहू नयेत म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था गावकरी करतात. त्यासाठी प्रत्येक घरुन अन्नधान्य न सांगता दिले जाते. डाळ, गव्हाचे पीठ, तांदूळ, भाजीपाला आणि परिस्थितीनुसार वर्गणी दिली जाते. गावातील ही परंपरा पाहून बाहेरगावावरून येणारे पाहुणेसुद्धा भारावून जातात. यावेळी उरलेले अन्नधान्य मृतकाच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाते.