घुग्घूस: घुग्घूस कोळसा खाणीच्या कारगिल चौकात हायवा ट्रकने एका कोळसा वाहतूक कामगाराला चिरडले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. मारोती नीळकंठ बाधे (३०) असे मृत कामगाराचे नाव असून तो म्हातारदेवी येथील रहिवासी आहे. मृत मारोती बीजीएल या कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होता. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोळसा भरून निघालेल्या एचएलए कंपनींच्या हायवा ट्रक (एमएच ४०-७५७०) ने घुग्घूस कोळसा खाणीच्या कारगिल चौकात मारोतीला जोरदार धडक दिली. यात हायवाखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर मृताचे नातलग घटनास्थळावर पोहचण्याअगोदरच मृतदेह उचलून पोलीस ठाण्यात आणल्यामुळे प्रचंड रोष निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने दंगा नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान, घुग्घूसचे ठाणेदार मनीष ठाकरे, वेकोलिचे अधिकारी व मृतांच्या नातलग यांच्यात चर्चा झाली. वाटाघाटीनंतर मृताच्या नातलगांना साडेआठ लाख रुपयांची मदत देण्याचे संबंधित कंपनीने कबूल केल्यानंतर तणाव शांत झाला. यावेळी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी मृत मारोतीच्या वडिलांचाही अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातप्रकरणी घुग्घूस पोलिसांनी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
हायवाने कामगाराला चिरडले
By admin | Published: July 12, 2014 12:59 AM