घनश्याम नवघडे ।नागभीड : उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.नागभीड आणि ब्रह्मपुरी ही दोन शहरे तशी एकमेकांना नवीन नाहीत. पूर्वी ही दोन्ही शहरे एकाच तालुक्याचे अविभाज्य घटक होते. नंतर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ मे १९८१ रोजी स्वतंत्र नागभीड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. नागभीड स्वतंत्र तालुका झाल्यानंतरही विविध खरेदी, वैद्यकीय सोय आणि शैक्षणिक व अन्य कामांच्या निमित्ताने आजही नागभीडकरांचे ब्रह्मपुरीशी नाते जुळून आहे.या नात्याला वृद्धींगत करण्यासाठी दळणवळणाची साधनेही महत्त्वाची असतात. ती साधने आधीपासूनच उपलब्ध होती. नागभीड-ब्रह्मपुरी हा रेल्वेमार्ग तर इंग्रजकालीन आहे. आणि नागभीड-ब्रह्मपुरी राज्य मार्गही पुरातनच आहे. आता याच राज्यमार्गाचे ‘नॅशनल हायवे’मध्ये रूपांतर झाले असून कामही झपाट्याने सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.या नॅशनल हायवेवर नागभीड-ब्रह्मपुरी दरम्यान अनेक गावे आहेत. सुलेझरी, भिकेश्वर, नवेगाव पांडव फाटा, कोर्धा, पांजरेपार, किरमिटी फाटा, मेंढा, अड्याळ फाटा, सायगाटा मंदिर फाटा, खरबी आदी अनेक गावांचा यात उल्लेख करता येईल. पूर्वी राज्यमार्ग होता तेव्हा या मार्गाने बसमधून प्रवास करताना अपेक्षित गावाजवळ येत असल्याच्या अनेक खाणाखुणा डोक्यात तरळून जायच्या. ती ओळखीची झाडे, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत तटस्थपणे उभे असलेले एखाद्या गावातील मोडकेतोडके छोटेसे बसस्थानक हे सारे आता नामशेष झाले आहेत. ब्रह्मपुरीला उतरायचे आहे म्हटल्यावर खरबीच्या टेकरापासूनच बसमधून प्रवास करणारे प्रवासी उतरण्याची लगबग सुरू करायचे. पण आता या राज्यमार्गाचे नॅशनल हायवेमध्ये रूपांतर झाल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण झाले आहे.या रूंदीकरणात रस्त्याच्या आजूबाजूला असलेले वृक्ष, ओळखीच्या खाणाखुणा नामशेष झाल्याने या रस्त्यावरील गाव केव्हा येते हे कळतच नाही. बसचा वाहक घंटी वाजवून गाव आल्याचे सांगतो, तेव्हा ते गाव आल्याचे लक्षात येते. तद्वतच दुचाकीने किंवा चारचाकीने ब्रह्मपुरीला जाणाऱ्या किंवा ब्रम्हपुरीकडून नागभीडकडे प्रवास करणाऱ्यांना प्रवाश्यांना हाच अनुभव येत आहे.या महामार्गावर असलेल्या कोर्धा आणि मेंढा या गावातून दुभाजक काढण्यात आल्याने या गावांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या दुभाजकांमुळे गावेही प्रशस्त वाटत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गावर असलेल्या खुणा नव्या हायवेमुळे नामशेष झाल्या आहेत.हा नँशनल हायवे झाल्याने नागभीड -ब्रम्हपुरी प्रवासाला एक प्रकारचा हुरूपही आला आहे. एरव्ही ब्रह्मपुरीला जाऊन अमूक काम करून ये म्हटल्यावर आढेवेढे घेणारे ब्रह्मपुरीस जायला सहज तयार होताना दिसत आहेत. कारण रस्ताच एवढा प्रशस्त होत आहे की, गाडी सुरू केल्यानंतर ब्रह्मपुरी केव्हा आले याचा पत्ताच प्रवाशांना लागत नाही.
हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी जवळ; पण खाणाखुणा नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:31 AM
उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.
ठळक मुद्दे‘एनएच ३५३’ ची कमाल; नव्या रस्त्याने सौदर्यांत भर