लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील अर्ध्याअधिक बसस्थानकावर हा कक्ष नाही. ज्या ठिकाणी आहे, तिथे अत्यंत्य दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्तनदा मातांना उघड्यावरच स्तनपान करावे लागत आहे. विशेष म्हणजे, पहिला स्तनपान कक्ष स्थापन करण्याचा मान चंद्रपूर आगाराला आहे. त्यानंतर राज्यातील इतर आगारात हा कक्ष स्थापन करण्यात आला. मात्र, ज्या उद्देशासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला त्याला तिलांजली दिली जात आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या. बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सुविधाच नसल्याने स्तनदा माता या केंद्राकडे जातसुद्धा नसल्याचे चित्र आहे.चंद्रपूरनंतर राज्य सरकारने प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या स्थापनेनंतर महिलांनी याचे स्वागतही केली. मात्र, आता आगारातील हा कक्ष दुर्लक्षित झाला आहे. चंद्रपूर आगारात सद्य:स्थितीत नावालाच हा कक्ष शिल्लक आहे. या कक्षामध्ये साधे नामफलकसुद्धा नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना हिरकणी कक्षाची माहितीसुद्धा नाही. विशेष म्हणजे, आगारातील अनेक कर्मचाऱ्यांनाही या कक्षाबद्दल साधी माहिती नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
जागा मिळेल तिथेच स्तनपानचंद्रपूर येथे नव्याने बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकामध्ये एका छोट्याच्या खोलीत हा कक्ष आहे. मात्र, कक्षासंदर्भात कुठेच माहिती नाही. साधा नामफलकसुद्धा लावण्यात आला नाही. त्यामुळे स्तनदा महिला हा कक्ष शोधण्याच्या भानगडीत न पडता जिथे जागा मिळेल तिथेच त्यांना स्तनपान करावे लागत आहे.
राज्यात चंद्रपुरात पहिली संकल्पनाबाळाला नि:संकोचपणे स्तनपान करता यावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, ते सुदृढ व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर भट्टाचार्य यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्यानंतर चंद्रपूर आगारात पहिले हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. याचा लाभही अनेक स्तनदा मातांनी घेतला.
बाळाला आत्मसन्मानाने स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, बाळांना न्याय मिळत नसून येणाऱ्या पिढीच्या सुदृढतेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक माता आजही प्रवासादरम्यान स्तनपान करीत नसल्याची स्थिती आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून आगार प्रशासन, समाजानेही या कक्षाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.-डाॅ. किशोर भट्टाचार्यवैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर