चंद्रपूर महानगरपालिकेत बुधवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली. या सभेसाठी सभागृहात महापौर राखी कंचर्लावार, उपाध्यक्ष राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी व आयुक्त राजेश मोहिते सभागृहात उपस्थित होते. विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक या ऑनलाईन सभेत जुळले होते. महापौर कंचर्लावार यांनी ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. या इतिवृत्तानुसार, लेखापरीक्षण विभागाने ठेवलेला अनियमिततेचा ठपका आणि ७१ लेक्षा आक्षेपांसाठी दोषी असणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेत चर्चा करण्यापूर्वीच हा ठराव मंजूर कसा झाला आणि दोषी पदाधिकाऱ्यांना यातून का वगळले, असा आक्षेप काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक देवेंद्र बेले, नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढीया, अशोक नागपुरे, प्रशांत दानव, विना खनके, सकिना अन्सारी, निलेश खोब्रागडे आदींनी घेतला. दरम्यान, लेखापरीक्षण ठरावावरून सत्ताधारी व काँग्रेस नगरसेवकांमध्ये मोठा गदारोळ झाला. त्यानंतर काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी मनपासमोर येऊन ३१ मे २०२१ च्या ठरावाची प्रतिकात्मक होळी केली.
सर्वसाधारण सभेत नेमके काय घडले?
ऑनलाईन सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ८, ९ आणि १० असे तीन विषय ठेवण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्त मंजुरीचा विषय पुढे येताच सत्ताधारी व काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर विरोधक ऑनलाईन सभेतून बाहेर निघून मनपापुढे घोषणाबाजी केली. जन्माच्या वेळी शहरातील मुला-मुलींचे गुणोत्तर प्रमाण कसे आहे, याबाबतचा अहवालही यावेळी सभेत सादर करण्यात आला.
पुतळा हटविल्याने चुकीची कबुली!
चंद्रपुरातील मोहल्ला जटपुरा १ मधील शिट क्र. २३ नगर भूमापन क्रमांक २३३६ पैकी ५३ चौरस मीटर जागा हस्तांतरण करून सौंदर्यीकरण व देखभाल करण्याच्या ठरावाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या जागेवर आदिवासी समाजाने शहीद बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला होता. मात्र, मनपानेच हा पुतळा क्रेनने निष्ठूरपणे हटविला होता. त्याविरूद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक तुमराम यांच्या नेतृत्वात उपोषण सुरूच आहे. ही जागा आता शहीद बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी देण्याचा ठराव घेऊन मनपाने अप्रत्यक्षरित्या चुकीची कबुली दिली आहे.
कोट
लेखापरीक्षण अहवालानुसार सुमारे २०० कोटींच्या कामात अनियमितता झाली असून दोषींकडून वसूलपात्र रकमेची नोंद घेतली. मात्र, तत्कालिन पदाधिकारी नामानिराळे राहून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ठराव मंजूर केला. याविरूद्ध यापुढेही लढा देत राहू. पदाधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हा नोंदविण्याची आमची मागणी आहे.
-डॉ. सुरेश महाकुलकर, गटनेता काँग्रेस मनपा, चंद्रपूर
कोट
विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विनाकारण विरोध केला. आजच्या सभेत केवळ दोनच विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही सभा पाच मिनिटांतच गुंडाळल्याचा आरोप चुकीचा आहे. लेखापरीक्षण अहवालाबाबत घेतलेला ठराव नियमानुसारच आहे. त्यामुळे विरोध करण्यात तथ्य नाही.
-रवी आसवानी, सभापती, स्थायी समिती मनपा, चंद्रपूर