चंद्रपूर : अंगणवाडीतील बालकांना व गरोदर स्तनदा मातांना शासन स्तरावरुन जिल्हा परिषदेमार्फत घरपोच आहार पुरविला जातो. मात्र हा आहार निकृष्ट दर्जाचा असून यात सोंडे व अळ्या असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या कंत्राटदारांकडून हा टीएचआर पुरविला जातो, त्याला जिल्हा परिषद अध्यक्षांकडूनच पाठबळ दिले जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतिश वारजुकर व सदस्य विनोद अहीरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून नेमून दिलेल्या पुरवठाधारकांना घरपोच आहार पुरविण्याचे काम देण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीला पुरवठा सुरु होता. मात्र शासनाकडे पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त असल्याने शासनाने जिल्हास्तरावरच जिल्ह्यातील बचत गट व संस्था यांना निविदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचत गट व संस्थांना काही तालुक्याचे काम देण्यात आले होते.मात्र मूल तालुक्यातील इंदिरा विकास महिला मंडळ, चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट मूल रोड यांना मूल तालुक्यातील बालविकास प्रकल्प मूल अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांना टीएचआर पुरविण्याचे कंत्राट दिलेले होते. सदर टीएचआर सहा महिने ते तीन वर्ष लाभार्थी मुलांना सुक्ष्म पोषक तत्वांनी द्यावयाचे होते. तसेच गरोदर स्त्रिया व मातांना देखील द्यावयाचे होते. मात्र या मंडळाकडून घरपोच आहार निकृष्ट दर्जाचा पुरविला जात असल्याचे उघडकीस आले आहे. तरीही पुरवठाधारक इंदिरा विकास महिला मंडळ यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. यामुळे गरोदर स्त्रीया व स्तनदा माता व बालकांच्या जिवीताशी खेळ खेळला जात असल्याचे सतिश वारजुकर व विनोद अहिरकर यांनी सांगितले.२३ सप्टेंबर २०१५ रोजी मूल तालुक्यातील बावराळा येथील अंगणवाडी कार्यकर्ती व नागरिकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी मूल यांच्याकडे आहाराबाबत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी हडपे यांनी चौकशी करुन १५ सदस्यांचे बयानसुद्धा नोंदविलेले आहे. आहाराची तपासणी केली असता सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना देण्यात येणाऱ्या पॉकीटामध्ये सोंडे व अळ्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळचे वैद्यकीय अधिकारी जुनघरे तसेच पर्यवेक्षिका सु. आर. गोंगले यांच्या रुग्ण कल्याण समितीनेही तपासणी केली असता मुदतबाह्य आहार देण्यात येत असल्याचे आढळून आले. बेंबाळ अंगणवाडी क्र. पाचमधून आहाराचे पॉकीट बोलावून पहाणी केली असता पॉकीटावर उत्पादन तारीख १२ आॅगस्ट २०१३ अशी नमुद आहे. मात्र हे पॉकीट १८ सप्टेंबर २०१५ रोजी संबंधित अंगणवाडीला देण्यात आले आहे. वास्तविक हे पॉकीट उत्पादन तारखेच्या चार महिन्याच्या आत द्यायला हवे, असेही वारजुकर व अहीरकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे या पॉकीटांवर बॅच नं. नमूद नाही. फूड अॅन्ड ड्रग या कार्यालयाने प्रामाणित केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासनाची दिशाभूल करून ग्रामीण जनतेच्या जिवनाशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी येऊनही अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांचाही यात पूर्ण सहभाग असल्याचा आरोप वारजुकर व अहीरकर यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले या मूल तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्याच मतदार संघातील आहेत. मात्र त्यांचे इंदिरा विकास महिला मंडळाशी चांगले हितसंबंध असल्याने प्रत्येक अंगणवाडीत पुरविलेल्या निष्कृट दर्जाच्या टीएचआर पुरवठ्याकडे त्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप सतिश वारजुकर व विनोद अहीरकर यांनी केला आहे.आहारा निकृष्ट असून यात अळ्या व सोंडे असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अन्न व औषध या कार्यालयाकडून चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा.-सतीश वारजुकर,गटनेता (काँग्रेस), जिल्हा परिषद चंद्रपूर.संपूर्ण जिल्ह्यामध्येच असा प्रकार होत असल्याची शंका असल्याने पुरवठा केलेल्या आहाराच्या नमुण्याची तपासणी करण्यात यावी व दोषींचे करारनामे रद्द करावे. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.- विनोद अहीरकर,सदस्य, जिल्हा परिषद, चंद्रपूर
घरपोच आहारात अळ्या-सोंडे !
By admin | Published: October 06, 2015 1:07 AM